जगातील सर्वात उंच कुटुंब ठरण्यासाठी कुलकर्णी प्रयत्नशील

पुणे दि.२५- त्यांची गोष्ट तशी जगावेगळीच म्हणावी लागेल. एक काळ असा होता की उंची ही त्यांच्यासाठी मोठी अडचण होती. आता मात्र जगातील सर्वात उंच कुटुंब अशी स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याची संधी त्यांना आली आहे आणि ते त्यासाठी प्रयत्नही करत आहेत.

पुण्याचे शरद कुलकर्णी, त्यांची पत्नी संज्योत आणि मुली मृगा, सानया हे ते जगावेगळे ठरू शकणारे कुटुंब आहे.

शरद कुलकर्णी आणि त्यांची पत्नी संज्योत यांची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डने सर्वाधिक उंच जोडी म्हणून यापूर्वीच घेतली आहे. शरद यांची उंची आहे सात फूट दीड इंच. तर संज्योत यांची उंची आहे सहा फूट अडीच इंच. एक काळ असा होता, शरद तरूण वयात होते तेव्हाच त्यांची ऊंची सात फूटावर होती आणि ते त्यामुळे अडचणीत होते. लोकांची कुचेष्टा सहन करावी लागत असे. मग त्यांनी सगळे लक्ष खेळात घातले आणि देशासाठी बास्केट बॉल खेळायला सुरवात केली. संज्योत या तर खेडेगावात राहणार्‍या .त्यांची उंची होती सहा फूटाहून अधिक. मुख्य अडचण लग्नाचीच. कारण भारतात नवर्‍यापेक्षा बायको कधीच उंच असत नाही. आपले लग्न होणार नाही याची खूणगाठ मनाशी बांधलेल्या संज्योत यांच्या मदतीला आली त्यांची आजी. शरद कुलकर्णी एकदा मुंबईत रस्त्यावरून निघाले होते आणि संज्योत यांच्या आजीने त्यांना बरोब्बर हेरले. चौकशी झाली आणि चक्क लग्नच ठरले. १९८८ ला हा विवाह झाला आणि त्यानंतर ते लिम्का रेकॉर्डसमध्ये उंच जोडी म्हणून नोंदले गेले.

शरद सांगतात, त्यावेळी आम्हाला आपणही कोणी वेगळे आहोत हे जाणवले आणि मग गिनिज बुक करताही प्रयत्न सुरू झाले. पण स्टॉकहोमच्या वेन आणि लॉरी हेलविस्टने जगातील सर्वाधिक उंच कपलचा मान पटकावला. थोडी निराशा झाली पण आता पुन्हा आम्ही जगातील सर्वाधिक उंच कुटुंब म्हणून मानांकन मिळविण्याचा प्रयत्न करतो आहोत. त्यांच्या मुली मृगा आणि सानया अनुक्रमे ६ फूट १ इंच आणि सहा फूट चार इंच उंचीच्या आहेत. या कुटुंबाची एकत्र उंची होते २६ फूट. दोघी मुलींना मॉडेल बनायचे आहे. गिनीज बुक रेकॉर्डसाठी सर्वात उंच कुटुंब अशी कॅटेगरी नाही. पण ती लवकरच येईल अशी त्यांना अपेक्षा आहे.
 
आज या कुटुंबाच्या अडचणी आहेत त्या म्हणजे, त्यांना कधीच रेडिमेड कपडे घेता येत नाहीत. घरातील बेडसह सर्व फर्निचर वेगळे बनवून घ्यावे लागते. इतकेच नव्हे तर पादत्राणे युरोपमधून मागवावी लागतात. स्वयंपाकघरातील , स्नानघरातील सोयी उंचीनुसार करून घ्याव्या लागतातच पण दरवाजेही बदलून घ्यावे लागले आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा उपयोग नाही. त्यामुळे स्कूटरवरच सारा भर द्यावा लागतो. तसेच विमानाने जायची वेळ आलीच तर सर्वात पुढची अथवा इमर्जन्सी एक्झिट दाराजवळचीच सीट घ्यावी लागते.

Leave a Comment