२६/११ हल्ला- दहशतवादी अबू हम्जाला अटक

नवी दिल्ली दि.२५- मुंबईत झालेल्या २६/११च्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपींना मदत करणारा व कसाबचा साथीदार असलेला कुख्यात दहशतवादी अबू हमजा उर्फ रियासत अली, याला दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक केली.
अबू हमजाचा तपास गेल्या अनेक वर्षांपासून पोलीस करत होते. दिल्ली पोलिसांनी त्याच्या विरोधात २ जून २०१२ रोजी अजामीनपात्र अटक वॉरंट काढले होते. अबू हमजाचे लष्कर तोयबा आणि इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचे सांगितले जाते.

अबू हमजा हा नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर येत असल्याची माहिती दिल्ली पोलिसांच्या विशेष तपास विभागाला मिळाली. त्या माहितीनुसार दिल्ली पोलिसांनी सापळा रचून एका संशयिताला पकडले. त्याची चौकशी केली असता तोच अबू हमजा असल्याचे स्पष्ट झाल्याचे कळते. अबू हमजाकडे पाकिस्तानचा पासपोर्ट आणि अन्य काही महत्वाची कागदपत्र मिळाल्याचेही खात्रीलायक सूत्रांनी सांगितले.

अबू हमजाला अटक केल्यानंतर त्यास तीस हजारी न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने अबूला ५ जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्याचे आदेश दिला. मुंबई, हैदराबाद, दिल्ली या ठिकाणी झालेल्या स्फोटासंदर्भात त्याची चौकशी करण्यात येईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.