शौचालयांची गरज

आपल्या देशातला सर्वात गंभीर प्रश्‍न कोणता, असा प्रश्‍न विचारल्यास अनेक प्रश्‍नांची जंत्री डोळ्यासमोर येते. परंतु कोणी तरी देशातला सर्वात गंभीर प्रश्‍न शौचालयांचा आहे असे म्हणायला लागले तर देशातल्या प्रश्‍नांची जाण नसणारे लोक त्याला वेड्यात काढल्याशिवाय राहणार नाहीत इतकी या प्रश्‍नाविषयी समाजात उदासीनता आहे. देशातल्या निम्म्यापेक्षा अधिक लोकांना शौचालयाची सोयच उपलब्ध नाही, ही वस्तुस्थिती आहे. पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की, ज्यांना ही सोय उपलब्ध असते त्यांना ती उपलब्ध नसणार्‍यांचे दु:ख आणि अडचण कळत नाही. त्यापेक्षा अधिक दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की, ज्यांना उघड्यावर शौच्याला जावे लागते त्यांना उघड्यावर शौच्याला जावे लागणे ही एक समस्या आहे याची मुळी जाणीव झालेली नाही. परंतु वस्तुत: ही मोठी समस्या आहे आणि ती केवळ शौच्याला जाण्याशी संबंधित नसून अतीशय व्यापक आहे हे तर भल्या भल्यांनाही माहीत नाही. मग माहीतच नाही तर या समस्येचे निवारण करण्याचा प्रयत्न तरी ते कशाला करतील? केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री जयराम रमेश यांना मात्र या प्रश्‍नाचे गांभीर्य कळलेले आहे आणि म्हणून ते ही समस्या सोडविण्यासाठी जिद्दीने कामाला लागले आहेत.

त्यामुळे त्यांनी या मंत्रिपदाचा कारभार हाती घेतल्यापासून भारताच्या ग्रामीण भागामध्ये आरोग्याच्या दृष्टीने काय काय करता येईल या दिशेने मोठे प्रयत्न सुरू केले आहेत. ग्रामीण भागामधील लोकांना उघड्यावर शौच्याला जाण्याची मोठी सवय आहे आणि ही सवय मोडून गावे हागणदारीमुक्त करण्याचा निर्धार जयराम रमेश यांनी केलेला आहे. हे काम अवघड आहे, पण मंत्रिमहोदयांचा निर्धार सुद्धा तेवढाच पक्का आहे. त्यातूनच काल ओरिसातील चांडीपूर येथे त्यांच्या हस्ते सेंद्रीय शौचालयाचे उद्घाटन करण्यात आले. सध्या राजकारणामध्ये निरनिराळ्या प्रकारच्या उलाढाली सुरू आहेत. परंतु या उलाढालीच्या खळबळजनक बातम्यांच्या मध्ये सेंद्रीय शौचालयासारख्या विकासाच्या बातमीकडे लक्ष द्यायला कोणालाच सवड नाही. पण सेंद्रीय शौचालय ही सध्याची विकासाच्या बाबतीतली तरी सर्वात खळबळजनक पण सकारात्मक बातमी आहे. हे सेंद्रीय शौचालय संरक्षण संशोधन आणि विकास संघटना या लष्करी संशोधन करणार्‍या संस्थेने विकसित केलेले आहे.

कमी खर्चातले हे शौचालय भारतामध्ये सरसकट वापरले जावे यासाठी जयराम रमेश यांचा प्रयत्न आहे आणि त्यांनी सुरुवातीच्या पायरीवर तरी भारतातल्या एक हजार खेड्यांमध्ये ही शौचालये उभारण्याची घोषणा केली आहे. आपण महिलांच्या संरक्षणाच्या आणि कल्याणाच्या अनेक गोष्टी बोलत असतो. परंतु देशातल्या ५० टक्क्यांपेक्षाही अधिक महिलांना उघड्यावर शौच्याला जावे लागते, याची आपल्याला खंत वाटत नाही. म्हणूनच जयराम रमेश यांनी या नवीन शौच्यालयाचे उद्घाटन करताना ही गोष्ट मुद्दाम नमूद केली. आपण जोपर्यंत महिलांचा सन्मान अशा पद्धतीने राखत नाही तोपर्यंत आपल्याला त्यांच्या विकासाच्या गप्पा मारण्याचा अधिकार नाही, असे त्यांनी मोठ्या परखडपणे प्रतिपादन केले.

शौचालयाचा प्रश्‍न हा केवळ मानवी प्रतिष्ठेचाच प्रश्‍न आहे असे नाही, तर तो आपल्या आरोग्याचा प्रश्‍न आहे. देशातल्या सर्व १२० कोटी लोकांना जोपर्यंत पिण्याचे शुद्ध पाणी पुरवले जात नाही तोपर्यंत आरोग्य सुधारणे शक्य नाही. मात्र या देशामध्ये जोपर्यंत उपलब्ध शुद्ध पाणी अशुद्ध करण्याची काही कारणे मौजूद आहेत तोपर्यंत तरी शुद्ध पाण्याचा पुरवठा करणे हे एक स्वप्नच ठरणार आहे. आपण भारतीय लोक स्वत:च्याच करणीने आपले पाणी अशुद्ध करत असतो. त्यातले सर्वात मोठे कारण म्हणजे उघड्यावर शौच्याला बसणे. या एका सवयीमुळे आपण आपल्या देशामध्ये केवळ पाणीच अस्वच्छ करतो असे नाही तर अन्यही प्रकारांनी आरोग्याचे प्रश्‍न जटील करत असतो.

भारतातील ६० टक्के जनतेला शौचालयाची सोय उपलब्ध नाही. त्यामुळे या देशातले ६० टक्के लोक किंवा जवळपास ७० कोटी लोक उघड्यावर शौच्याला बसतात. या बाबतीत भारताचा जगात पहिला क्रमांक आहे. भारताच्या खालोखाल इंडोनेशियामध्ये हे प्रमाण आढळते. १९९० सालपासून जगभरामध्ये ही सवय बंद करण्याचे प्रयत्न काही आंतरराष्ट्रीय संघटनांकडून केले गेले. परंतु २०१० सालपर्यंत निदान भारतात तरी ही सवय बदलली गेली नाही. भारतामध्ये २४ लाख ग्रामपंचायती आहेत. त्यातल्या केवळ २४ हजार ग्रामपंचायतींनी गावातल्या प्रत्येकाला शौचालयाची सोय उपलब्ध करून दिली.  उघड्यावर शौच्याला जाणारे लोक जलाशयाच्या काठी शौच्याला बसतात. काही लोक नद्यांच्या काठी बसतात आणि त्यांची विष्ठा पाण्याच्या संपर्कात येते. हे पाणी अनेक कामांसाठी वापरले जाते आणि त्यामुळे रोगांचा प्रसार होतो. अशा रितीने ही नवी शौचालये आरोग्याच्या मूळ समस्येचे निराकरण करणारी आहेत. अशा शौचालयांच्या दृष्टीने केवळ भारतातच नव्हे तर सार्‍या जगातच संशोधन सुरू आहे आणि भारतातले हे संशोधन सार्‍या मानवतेला उपयोगी पडणारे आहे.

Leave a Comment