हावडा(पश्चिम बंगाल) दि.२५- गुडगाव येथे माही नावाची ५ वर्षाची चिमुकली बोअरवेलमध्ये पडून मृत्यूमुखी पडली. अशाच प्रकारची आणखी एक घटना पश्चिम बंगालमध्ये घडली आहे. विहिरीत पडलेल्या एका १५ वर्षांच्या मुलाला वाचविण्यात अपयश आले. रोशन पारसी असे या मुलाचे नाव आहे. हाती आलेल्या वृत्तानुसार, रविवारी सायंकाळी रोशन विहिरीत पडला. मध्यरात्रीनंतरच त्याला बाहेर काढण्यात आले. परंतु, त्यापुर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. तो ज्या विहिरीत पडला होता, ती वापरात नव्हती.
रोशनला बाहेर काढताना योग्य प्रकारे काळजी घेण्यात आली नाही, असा आरोप होत आहे. अधिका-यांनी त्याच्या गळ्यात दोर बांधुन वर काढले. त्यामुळेच मृत्यू झाला, असा आरोप करण्यात आला आहे. परंतु, शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच नेमके कारण कळू शकेल.
अधिका-यांनी मात्र सर्व आरोप फेटाळले आहेत. सीसीटीव्ही कॅमेरातील दृष्यांनुसार रोशनचा मृत्यू त्याला बाहेर काढण्यापुर्वीच झाला होता.