डॉलर तुलनेत रुपया कोलमडल्याने विश्व मराठी साहित्य संमेलन अडचणीत

पुणे, दि.२५ – जागतिक बाजारपेठेत डॉलरच्या वधारलेल्या भावाचा फटका टोरांटो येथील विश्‍व साहित्य संमेलनाला बसला आहे. निधी संकलन अर्थकाऱण कोलमडल्याने ऑगस्टच्या सुरवातीला होणारे विश्‍व साहित्य संमेलन आता महिनाअखेरीस होणार आहे.

टोरांटो येथील मराठी मंडळाने यंदाच्या चौथ्या विश्‍व साहित्य संमेलनाच्या आयोजनाची जबाबदारी स्वीकारली आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात होणारे हे संमेलन तांत्रिक कारणामुळे रद्द करून काही दिवसांसाठी पुढे ढकलण्याचा निर्णय मराठी मंडळाने घेतला. त्यामुळे हे संमेलन होणार का, अशी चर्चा साहित्य वर्तुळात रंगली होती.

मात्र, मराठी मंडळाने आपल्या संकेतस्थळावर ३१ ऑगस्ट, एक आणि दोन सप्टेंबर अशा विश्‍व साहित्य संमेलनाच्या तारखा जाहीर केल्या आहेत. टोरांटोमधील मिसिसागा येथील लिव्हिंग आर्टस सेंटर येथे हे संमेलन होणार असून, त्याचे अध्यक्षपद ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर भूषविणार आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे यांनी विश्‍व साहित्य संमेलन ऑगस्टअखेरीस होणार असल्याच्या माहितीला दुजोरा दिला.

मात्र, जागतिक बाजारपेठेतील घडामोडींचा फटका विश्‍व साहित्य संमेलनाला बसला आहे. डॉलरच्या भाव वधारला असून त्यामुळे निधी संकलनामध्ये अडथळे निर्माण झाले आहेत. हे संमेलन निश्‍चित झाले तेव्हा एका डॉलरचा विनिमय दर ४७ रुपये होता. मात्र, सध्या एका डॉलरसाठी ५७ रुपये मोजावे लागत आहेत. ही अर्थकारणाची वस्तुस्थिती संमेलनाच्या तारखा पुढे जाण्यास कारणीभूत ठरली असल्याची माहिती साहित्य महामंडळाच्या विश्‍वसनीय सूत्रांनी दिली. आर्थित चणचण संपविण्याच्या उद्देशातून आयोजक संस्थेने आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून या विश्‍व साहित्य संमेलनाला राज्य सरकारने ५० लाख रुपयांचे अर्थसाह्य करावे, अशी मागणी केली आहे. मात्र, त्यासंदर्भात सरकारच्या पातळीवर फारसे घडलेले नाही, असेही या सूत्रांनी सांगितले.

Leave a Comment