जगनमोहन रेड्डी यांच्या कोठडीत वाढ

हैदराबाद, दि. २५ – सीबीआयच्या स्थानिक न्यायालयाने वायएसआर काँग्रेसचे अध्यक्ष जगनमोहन रेड्डी यांची न्यायालयीन कोठडी ४ जुलैपर्यंत वाढविली आहे. यापूर्वी दिलेली रेड्डी यांची न्यायालयीन कोठडीची मुदत आज संपली होती. दरम्यान, जगनमोहन रेड्डीना भेटण्यास पी. ए. संगमा यांना चंचलगुडा तुरुंग प्रशासनाने नकार दिला आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत पाठिंबा मिळविण्यासंदर्भात आज पी. ए. संगमा रेड्डी यांना चंचलगुडा तुरुंगात भेटणार होते. न्यायालयीन कोठडी आज संपल्याने रेड्डींची सुटका होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. परंतु, सीबीआय न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडी ४ जुलैपर्यंत वाढविली आहे.

या महिन्यात झालेल्या पोटनिवडणुकीत वायएसआर काँग्रेसने लोकसभेची एक जागा आणि विधानसभेच्या १८ जागा जिंकल्या आहेत. बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी रेड्डी यांची सध्या सीबीआय चौकशी सुरू आहे. अंमलबजावणी संचालनालयाकडूनही त्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वायएसआर काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये कटुतेचे वातावरण तयार झाले आहे. या पार्श्वभूमीवर रेड्डी आणि संगमा यांची भेट महत्त्वपूर्ण ठरणार होती.