म्युच्युअल फंडांची ‘सेबी’ चौकशी करणार

मुंबई,  दि. २३ – देशातील म्युच्युअल फंडांच्या ज्या योजना बंद आहेत किंवा कार्यरत नाहीत अशा योजनांची चौकशी करण्यात येईल, असे सेबीचे अध्यक्ष यू. के. सिन्हा यांनी म्हटले आहे. भारतीय उद्योग महासंघाने (कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज अर्थात सीआयआय) आयोजित केलेल्या म्युच्युअल फंड उद्योगाच्या परिषदेमध्ये ते बोलत होते.

ज्या योजना बाजारात दाखल झाल्यापासून सुमार कामगिरी करीत आहेत, अशा फंड योजनांच्या वरिष्ठ अधिकार्‍यांची चौकशी करण्यात येणार असल्याचे सिन्हा यांनी सांगितले. तसेच इनसायडर ट्रेडिंग संदर्भातील प्रकरणांची चौकशी करण्यासाठी दूरध्वनी संभाषणांचे जुने रेकॉर्ड तपासण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणही सेबीने सरकारकडे केली असल्याचेही त्यांनी सांगितले. दीर्घ काळापासून सुमार कामगिरी करणार्‍या फंडांबाबत संबंधित कंपन्यांनी गांभीर्याने पाहणे आवश्यक असून त्यावर उपाय म्हणून या योजना एकमेकांमध्ये विलीन करण्याबाबतही विचार करावा, असेही त्यांनी सांगितले.

सुमार कामगिरी करीत असलेल्या म्युच्युअल फंड वितरक कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व फंड मॅनेजर यांना सेबीकडून जाब विचारला जाईल. तसेच फंडातील गुंतवणुकीबाबतच्या नियमावलीचे पालन केले जाते की नाही याबाबत सेबी, ऍसेट मॅनेजमेंट कंपन्यांवर नजर ठेवेल, असेही सिन्हा यांनी सांगितले. गुंतवणूक हाच उद्देश ठेवून प्रत्येक म्युच्युअल फंडाची योजना आणली जाते. यामध्ये गुंतवणूक करणार्‍या गुंतवणुकदारांनाही फायदा व्हावा, ही अपेक्षा असते. यामुळे सुमार कामगिरी करणार्‍या योजनांची कंपन्यांनी दखल घेणे आवश्यक असल्याचे सिन्हा म्हणाले.

Leave a Comment