प्रणव मुखर्जी हे माझे गुरू; मात्र, लोकशाहीसाठी लढत – संगमा

नवी दिल्ली, दि. २४ –  ‘यूपीए’चे राष्ट्रपतिपदाचे उमेदवार प्रणव मुखर्जी हे माझे गुरू आहेत. तथापि, मी लोकशाही मूल्यांचे जतन करण्यासाठी राष्ट्रपतिपदाची निवडणूक त्यांच्याविरोधात लढवित आहे, असे प्रतिपादन लोकसभेचे माजी सभापती आणि राष्ट्रपतिपदाचे उमेदवार पी. ए. संगमा यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले.

ते केवळ माझे मित्रच आहेत असे नसून ते माझे गुरू आहेत. मी त्यांच्या बुद्धिमत्तेचे कौतुक करतो. त्यांच्या कार्यक्षमतेचे कौतुक करतो. मी त्यांच्याजवळपासही पोहचू शकत नाही. त्यांना भरपूर अनुभव आहे, ते उत्तम प्रशासक आहेत. कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांची कारकीर्द प्रदीर्घ आहे. मात्र, माझा लढा हा तत्त्वासाठी आहे. ते तत्त्व म्हणजे या देशातील आदिवासींचा विकास होय, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आपण ‘एनडीए’चे उमेदवार आहात का, या प्रश्‍नावर ते म्हणाले की,  मी एक गोष्ट स्पष्ट करतो की, मी कोणत्याही राजकीय पक्षाचा उमेदवार नाही. मी आदिवासी विकास आघाडीतर्फे ही निवडणूक लढवित आहे. माझ्या उमेदवारीस बिजू जनता दलाचे नवीन पटनाईक आणि अण्णा द्रमुकच्या जयललिता या दोन दिग्गजांनी सर्वप्रथम पाठिंबा दिला आहे. आता भाजप आणि एनडीएतील काही घटक पक्षांनी पाठिंबा दिला आहे.

एनडीएतून संयुक्त जनता दल व शिवसेना वजा केल्यावर आणि त्यात अण्णा द्रमुक व बिजू जनता दलाची मते मिळविल्यावर आपणास जेमतेम २८ टक्के मते मिळू शकतील असे असताना आपणा विजयाची खात्री वाटते का?

त्यावर संगमा म्हणाले की, पहिली गोष्ट म्हणजे, भाजपने माझ्या उमेदवारीस पाठिंबा दिला आहे. कालच मी त्यांचा अधिकृत उमेदवार झालो आहे. आत्ता ही केवळ सुरुवात आहे. आपल्याला माहिती आहे की, अनेक लहान-मोठ्या पक्षांत मला पाठिंबा देण्यावरुन एकमत नाही. त्यामुळे अजून एक आठवडा राजकीय घडामोडींकडे लक्ष ठेवावे लागेलच. राजकारणात काहीही घडू शकते. पाकिस्तानात काय झाले? पंतप्रधानपदाचा काल जाहीर केलेला उमेदवार आज नाही.

ममता बॅनर्जींनी तुम्हाला पाठिंबा देण्याचे मान्य केले आहे का, असे विचारता ते म्हणाले की, हे पाहा, ममतांनी प्रथम डॉ. कलाम यांचे नाव जाहीर केले. कलाम यांनी निवडणुकीस नकार दिला. माझी त्यानंतर ममतांशी भेट झालेली नाही.

आपण कॉंग्रेसमध्ये होता. नंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संस्थापक सदस्य बनला. काही काळ आपण तृणमूल कॉंग्रेसमध्ये होता. पुन्हा राष्ट्रवादीत गेला. आता तेथूनही बाहेर आला. एक़ा पक्षात आपण १० वर्षेही स्थिरावला नाही, असे असताना तुमच्या उमेदवारीवर विश्‍वास कसा टाकायचा?

या प्रश्‍नावर संगमा म्हणाले की, मी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा अनुयायी आहे. त्यांच्या राजकीय कारकीर्दीकडे नजर टाका. ते नेहमी विशिष्ट तत्त्वावर ठाम राहिले. त्यांनी तत्त्वासाठी कॉंग्रेस सोडली. स्वत:चा राजकीय पक्ष स्थापन केला. पुन्हा आवश्यकता भासली तेव्हा कॉंग्रेसचे सदस्य झाले. कॉंग्रेसचे अध्यक्ष झाले व पुन्हा कॉंग्रेसमधून बाहेर पडले. मी देखील त्याच तत्त्वासाठी कॉंग्रेस सोडली, राष्ट्रवादी सोडली. आता हा जुना विषय झाला आहे. आदिवासींचा विकास हे एकच तत्त्व असून त्याच्याशी ठाम आहे.

आपण या निवडणुकीत विजयी व्हाल, असे आपणास मनापासून वाटते का, असे विचारता ते म्हणाले की, अर्थातच, मी नक्कीच विजयी होईन.

Leave a Comment