अमेरिका-पाकिस्तानात पुन्हा नव्याने संघर्ष होण्याची शक्यता

वॉशिंग्टन, दि. २४ – एका अमेरिकी लष्करी सरसेनानीने काबूलमधील एका हॉटेलावर झालेला हिंसक हल्ल्यामागे पाकिस्तानातील हक्कानी नेटवर्कचे दहशतवादी होते, असा आरोप केल्यामुळे, अमेरिका आणि पाकिस्तानात पुन्हा नव्याने संघर्ष होण्याची शक्यता आहे. भविष्यात असा हल्ला पुन्हा होऊ नये, यासाठी आवश्यक पावले उचलण्यात येतील, अशी प्रतिज्ञा अमेरिकी प्रशासनाने केली आहे.

अमेरिकी फौजा आणि आस्थापनांवर दहशतवाद्यांचे नंदनवन ठरलेल्या पाकिस्तानी भूमीवरून हल्ले होत असल्याचे आता सूर्यप्रकाशाएवढे स्पष्ट झाले आहे, असे व्हाईट हाऊसचे माहिती उपसचिव जोश अर्नेस्ट यांनी अमेरिकी अध्यक्षांच्या खास एअरफोर्स वन विमानात पत्रकारांशी बोलताना सांगितले.

काबूलमधील हल्ल्यामागे हक्कानी नेटवर्क असल्याचा आरोप अफगाणिस्तानातील नाटो फौजांचे अमेरिकी कमांडर जनरल जॉन ऍलन यांनी केला आहे. नेटवर्कच्या दहशतवाद्यांनी काबूलमधील लेकसाईड हॉटेलला शुक्रवारी सुमारे १२ तास वेढा घातला होता. त्यानंतर झालेल्या हल्ल्यात १८ लोक ठार झाले आहेत.

ऍलन यांनी या हल्ल्यानंतर केलेल्या निवेदनात अलकायदा या दहशतवादी संघटनेशी संबंधित असलेल्या नेटवर्कवर आरोप केले आहेत. यापूर्वी अमेरिकेचे संरक्षणमंत्री लिऑन पेनेट्टा यांनीही असे आरोप केले होते. पाकिस्तानची भूमी दहशतवाद्यांसाठी नंदनवन ठरू नये यासाठी उपाययोजना करावी, या अमेरिकेच्या मागणीला पाकिस्तानने कायम वाटाण्याच्या अक्षता दिल्या आहेत. पाकिस्तानच्या असहकारामुळे अमेरिकी प्रशासन प्रक्षुब्ध बनले आहे.

यासंदर्भात अर्नेस्ट म्हणाले, की अमेरिकेने यापूर्वी अनेकवेळा जाहीरपणे आणि खासगीरित्या पाकिस्तान सरकारपुढे हा मुद्दा उपस्थित केला होता. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत पाकिस्तानशी असलेल्या सहकार्याला अमेरिका महत्त्व देत असले, तरी अमेरिकी सुरक्षा दलांसह सर्वसामान्य पाकिस्तानी नागरिकांनाही धोकादायक ठरणार्‍या दहशतवादी गटांशी मुकाबला करण्याची आवश्यकता आहे.

Leave a Comment