अणु ऊर्जा तंत्रज्ञांना उत्तम संधी

भारतात सध्या ४,५७० मेगावॉट अणु ऊर्जा निर्माण होते. देशाच्या एकूण उर्जेच्या गरजेपैकी ती केवळ ३ टक्के एवढी आहे. २०२० सालपर्यंत ही ऊर्जा निर्मिती २० हजार मेगावॉट पर्यंत नेली जाणार आहे, तर २०३२ सालपर्यंत ती ६३ हजार मेगावॉट व्हावी असा सरकारचा प्रयत्न आहे. याचा अर्थ पुढच्या २० वर्षात भारतात अणु उर्जेची निर्मिती चौदा पटीने वाढणार आहे आणि त्या प्रमाणात या क्षेत्रात मोठ्या संख्येने रोजगार निर्मिती होणार आहे.

भारतात थोरियम भरपूर सापडते. त्यावर प्रक्रिया करून वीज निर्मिती करण्याचा शोध लागला तर भारतातली ही रोजगार निर्मिती आणि ऊर्जा निर्मिती केवळ चौदा पटच नव्हे, तर शंभर पटीने जास्त होण्याची शक्यता आहे. या क्षेत्रात नोकर्‍या मिळविण्यासाठी मेकॅनिकल इंजिनिअरींग, इन्स्ट्रूमेंटेशन इंजिनिअरींग या क्षेत्रातील उमेदवारांना प्रयत्न करता येईल. भाभा अणु संशोधन केंद्रातर्फे या क्षेत्रात निर्माण होणार्‍या अनेक नोकर्‍यांची माहिती प्रसृत करण्यात आली आहे. त्यानुसार आगामी पाच वर्षात कमीत कमी १० हजार ते जास्तीत जास्त १९ हजार प्रशिक्षित कर्मचारी आणि तंत्रज्ञ भारताला लागणार आहेत. प्रशिक्षित कर्मचार्‍यांची ही गरज तूर्तास तरी त्या त्या अणु ऊर्जा केंद्रात दिल्या जाणार्‍या प्रशिक्षणातून भागवली जात आहे.

अणु ऊर्जा निर्मितीच्या संदर्भातील शिक्षण घेतल्यास ते घेणार्‍यांना या क्षेत्रात चांगली मागणी येणार आहे. अणु ऊर्जा केंद्राशिवाय संरक्षण दलात सुद्धा या लोकांना नोकर्‍या मिळू शकतील. त्याचबरोबर न्यूक्लिअर रिऍक्टर्स म्हणजे अणु ऊर्जा केंद्रात लागणारी यंत्रसामुग्री आणि जनित्रे यांची निर्मिती करणार्‍या कारखान्यांत सुद्धा या प्रशिक्षित तंत्रज्ञांना उत्तम पगाराच्या नोकर्‍या मिळू शकतात. अणु उर्जेच्या क्षेत्रामध्ये वैद्यकीय, अकौंटन्सी, प्रशासन याही क्षेत्रातील लोकांना नोकरीच्या संधी आहे. ऊर्जा निर्मिती आणि निर्मिती संचांचे संचालन अशी कामे करणार्‍या लोकांना उच्च शिक्षण घ्यावयाचे असल्यास शास्त्र शाखेच्या शिक्षणाची पार्श्‍वभूमी आवश्यक आहे. 

कानपूर आयआयटीमध्ये आणि दिल्ली विद्यापीठाच्या न्युक्लिअर सायन्स ऍन्ड टेक्नॉलॉजी विभागामध्ये न्यूक्लिअर इंजिनिअरींगची पदवी देण्याची सोय आहे.दिल्ली विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षणाचीही सोय आहे. पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर अधिक संशोधन करू इच्छिणार्‍यांना संशोधनाची संधी चेन्नईच्या ऍमिटी युनिव्हर्सिटीमध्ये उपलब्ध आहे. चांगले करिअर करू इच्छिणार्‍या तरुणांनी या क्षेत्राकडे वळायला हरकत नाही.

Leave a Comment