अडवाणी यांच्या उंचीचा एकही नेता भाजपमध्ये नाही : शरद यादव

नवी दिल्ली, दि. २४ – माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांच्या उंचीचा एकही नेता आज तरी भाजपमध्ये नसल्याचे स्पष्ट करीत, संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष शरद यादव यांनी रविवारी अप्रत्यक्षपणे नरेंद्र मोदी यांना ‘लक्ष्य’ बनविले.

‘एनडीए’चा आगामी पंतप्रधान हा ‘सेक्युलर’ असावा, या नितीश कुमार यांच्या विधानाने निर्माण झालेले वादळ शांत होत नाही तोच यादव यांनी वरील विधान करून नव्या वादाला जन्म दिला.

पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, लालकृष्ण अडवाणी हेच भाजपचे स्वाभाविक नेते आहेत.  भाजप संसदीय मंडळाने निर्णय घेतल्यावर ‘एनडीए’ २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करेल.

एका प्रश्‍नाला उत्तर देताना ते म्हणाले की, भाजपशी आमचे अनेक प्रश्‍नावर मतभेद आहेत. मात्र, आम्ही किमान समान कार्यक्रमाच्या आधारे एकत्रित आलेलो आहोत.

भाजपमधील वाढत्या यादवीवर विचारता ते म्हणाले की, भाजप हा आमचा मित्र पक्ष असल्याने त्यावर भाष्य करणे योग्य नाही. तो त्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे.

बिहार व गुजरातची तुलना करताना यादव म्हणाले की, भारतात ब्रिटिशांची राजवट असल्यापासून गुजरात हे बिहारपेक्षा खूप विकसीत असे राज्य आहे. भ्रष्टाचाराबद्दल विचारता ते म्हणाले की, या समस्येचे मूळ जाती व्यवस्थेत आहे. तिचे समूळ उच्चाटन झाले पाहिजे.

Leave a Comment