अकोल्याच्या शिवाजी कोरडे यांचा मंत्रालयाच्या आगीत घुसमटुन मृत्यू

मुंबई, दि. २३ – मंत्रालयात लागलेल्या आगीत अकोल्याच्या शिवाजी कोरडे यांचा मृत्यू झाला. अकोला महानगरपालिका जिल्हाअध्यक्षपदी त्यांची निवड व्हावी म्हणून धोबी समाजाने त्यांचे नाव सुचवले होते. त्यांच्याबरोबर असणार्‍या राष्ट्रवादी सेवादलाच्या अनिल मलगे यांनी दिलेल्या माहितीनुसार अजित पवार यांच्या अँटी चेंबरमध्ये आमदार विनायक मेटे याच्याबरोबर बसलेल्या शिष्टमंडळाला जर बाजूच्या केबिनमध्ये बसलेल्या मंत्र्यांनी आणि तिथे असलेल्या लोकांनी आग लागल्याने आपण खाली पळत आहोत हे वेळीच सांगितले असते किंवा अजित दादांना ज्या सिक्युरिटीने बाहेर काढले त्यांनी आम्हालाही सांगितले असते, तर शिवाजी कोरडे यांचा जीव वाचला असता.

शिवाजी कोरडे यांची अध्यक्षपदी निवड व्हावी म्हणून अजित पवार यांची भेट घेउन धोबी समाजाचे शिष्टमंडळ आमदार विनायक मेटे यांना भेटायला आमदार निवासात गेले. तेव्हा मेटे यांनी पुन्हा त्यांना अजित पवार यांच्या दालनात येण्यास सांगितले. त्यावेळी अजित पवार यांची बैठक चालू असल्याने शिवाजी कोरडे, अनिल मलगे आणि मेटे हे पवारांच्या अँटी चेंबरमध्ये बसले होते. थोड्या वेळाने धूर झाल्यावर चेंबरमधील इतर पंधरा जण खाली पळाले. मात्र खूप धूर झाल्याने जिन्याचा वापर न करता कोरडे, मेटे आणि मलगे ड्रेनेजच्या पाईपवरून पाचव्या मजल्यापर्यंत खाली उतरले. विनायक मेटे यांनी अजित पवार यांना आपण पाचव्या मजल्यावर अडकल्याचे मोबाईलवरून कळवताच पवार यांनी अग्निशमन दलाला या अडकलेल्या लोकांना काढण्यास सांगितले. कोरडे यांना अस्थम्याचा त्रास असल्याने ते उतरू शकले नाहीत. इतर सर्व बचावले मात्र कोरडे यांचा घुसमटून मृत्यू झाला.

Leave a Comment