आता तरी शहाणे व्हा

मे महिना संपला की, सगळ्यांचे डोळे आभाळाकडे लागतात. पूर्वी कसे छान होते. रोहिणी नक्षत्रात वळवाचा पाऊस पडायचा आणि नंतर सात किंवा आठ जूनला मृग नक्षत्राचा पाऊस धो धो बरसून जायचा. असे एक-दोन पाऊस पडले की, पेरणीची घाई सुरू व्हायची. मृग नक्षत्र संपता संपता पेरण्या आटोपलेल्या असायच्या आणि आर्द्रा नक्षत्राच्या उन्हाने वाढीस लागलेल्या पिकाला सूर्यप्रकाशाचे अन्न मिळायचे. आता सारे टाईमटेबलच बिघडून गेले आहे. मे महिन्याच्या शेवटी शेवटी अंदमानच्या बेटावर पाऊस आला का? एक किंवा दोन जूनला तो केरळात बरसला का? आणि चार तारखेचा मुंबईत पाऊस पडला का असे प्रश्‍न आपण वेड्यासारखे विचारत आहोत. मात्र या वेळापत्रकाप्रमाणे पाऊस पडेनासा झाला आहे. शेतकर्‍यांचे डोळे कायम आभाळाकडे लागलेले आहेत. मृग नक्षत्र संपले आणि आर्द्रा नक्षत्र सुरू झाले तरी अजून पावसाचा पत्ता नाही. शेतकर्‍यांच्या काळजाचे पाणी पाणी होत आहे. आज पाऊस पडेल, उद्या पाऊस पडेल मग पेरण्या करू अशी आशा शेतकर्‍यांच्या मनाला लागून राहिली आहे. परंतु पाऊस सारखा लांबणीवर पडत आहे.

    पड रं पाण्या, पड रं पाण्या, कर पाणी पाणी |
    शेत माझं लई तान्हेलं चातकावाणी ॥

अशी गाणी म्हणून तो थकला आहे, पण पाऊस पडत नाही. हेही नक्षत्र कोरडे गेले की, शेतकर्‍यांचे विस्थापन सुरू होईल. काही गावांमध्ये गाढवाची लग्ने लावली जातील, तर काही गावांमध्ये महादेवाच्या पिंडीचा गाभारा पाण्याने भरून टाकला जाईल. (पूर्वी तो दुधाने भरला जात असे) असे कितीही उपचार केले तरी त्यामुळे पाऊस पडत नसतो. पण केवळ पावसाच्या आशेवर जगणार्‍या देवभोळ्या शेतकर्‍यांना अशा उपचाराचा एक मानसिक आधार मिळत असतो. एकंदरीत पावसाचे चलनवलन बिघडलेले आहे. ते सुधारणे आपल्या हातात नाही. मात्र त्याचा अंदाज घेऊन आपल्या शेतीचे वेळापत्रक बदलण्याची वेळ आली आहे. पाऊस आपल्यासाठी पडत नसतो. पाऊस हा समुद्र आणि आकाश यात घडणार्‍या काही नैसर्गिक प्रक्रियांचा परिपाक असतो. त्यामुळे पावसाने आपल्या मनाप्रमाणे पडावे असे म्हटल्याने तो आपल्या मनाप्रमाणे पडणार नाही, हे लक्षात ठेवावे लागेल. पाऊस त्याच्या लहरीने पडणार आहे, आपण त्याच्या लहरीचा अभ्यास करून आपली शेती अधिकात अधिक कशी पिकवता येईल याचा विचार केला पाहिजे.

आपल्या शेतीचे वेळापत्रक आणि तंत्रज्ञान हे आपण पावसानुसार ठरवले आहे. आधी भरपूर पावसातही येणारे खरीप पिके आपण घेतो आणि नंतर जमिनीत भरपूर ओल झाली की, त्या ओलीच्या आधारावर कमी ओलीत येणारी पिके रबी हंगामात घेत असतो. हे तंत्र आता आपल्याला बदलावे लागेल. हे वेळापत्रक बदलावे लागेल. हे पिकांचे तंत्र बदलावे लागेल. सुदैवाने माणसाला असे बदल करण्याइतकी बौद्धिक क्षमता प्राप्त झालेली आहे. तिचा वापर करून आपण आपली शेती बदलत्या हवामानात सुद्धा कशी छान करता येईल याचा प्रयत्न केला पाहिजे. कमी पाऊस पडला म्हणजे दुष्काळच पडावा असे काही नाही. परंतु पावसाचे आणि शेतीचे तंत्रज्ञान ज्ञात नसलेले लोक पावसाचा आणि दुष्काळाचा असा संबंध जोडत असतात. कमी पाऊस पडला की दुष्काळ पडला असे म्हणतात. खरे तर अशा लोकांना भरपूर पाऊस पडला तरी दुष्काळच जाणवत असतो. फक्त फरक एवढाच की, कमी पाऊस पडल्यास कोरडा दुष्काळ म्हणतात आणि जास्त पाऊस पडला की ओला दुष्काळ म्हणतात. एकंदरीत नेहमी दुष्काळच. म्हणजे त्यांच्या मनात दुष्काळ असतो. जे लोक पावसाच्या लहरीनुसार शेतीचे तंत्रज्ञान बदलतात त्यांना कधीच दुष्काळ जाणवत नाही. म्हणूनच आता पाऊस कितीही लांबला तरी यातूनही आपण काय करू शकतो याचा आणि याचाच विचार केला पाहिजे.

इस्रायलमध्ये आपल्यापेक्षा किती तरी कमी पाऊस पडतो. महाराष्ट्रात सरासरी ४० इंच पाऊस पडतो. परंतु इस्रायलमध्ये तर शतकानु शतके केवळ ८ इंच पाऊस पडत आलेला आहे. मग तिथे तर कायमच दुष्काळ पडायला पाहिजे. पण तसे न होता इस्रायलचे शेतकरी महाराष्ट्रापेक्षा चांगली शेती करतात आणि आपला शेतीमाल जगभरात निर्यात करतात. त्यांना ते शक्य होते आणि आपल्यालाच का होत नाही? याचे कारण असे की आपल्या मनाने दुष्काळाशी सामना करण्याचा निर्णय घेतलेला नाही. पाऊस कितीही पडो मात्र आपली शेती छान पिकेलच असा निर्धार आपण केला तर दुष्काळावर मात करणे शक्य होणार आहे. पाऊस कमी पडो की जास्त पडो, पडलेल्या पावसाचा थेंब अन् थेंब आपण जमिनीत जिरवला तर दुष्काळाचे काही कारणच नाही. फक्त पाणी जिरविण्याची दक्षता मात्र घ्यायची आहे. एवढे माहीत असूनही दुष्काळ का पडतो? याचे एक कारण म्हणजे पाणी जिरविण्याचे हे शाश्‍वत स्वरुपाचे काम आपण करायचे नसून सरकार येऊन करणार आहे, असा आपला समज आहे. आपण या समजातून जेव्हा बाहेर पडू आणि हातात कुदळ-खोरी घेऊन जलसंधारणाच्या कामाला लागू त्याच दिवशी आपली दुष्काळाला कायमचा रामराम ठोकण्याची तयारी सुरू झाली असे होईल.

Leave a Comment