मंत्रालय आग-आणखी एकाचा मृत्यू,अनेक बेपत्ता

मुंबई दि.२२- काल दुपारी मुंबईतील शासकीय इमारत मंत्रालयाला लागलेल्या प्रलंयकारी आगीचे तांडव शांत करण्यात अग्नीशमन दलाला यश आले असून आता ही इमारत थंड करण्याचे काम हाती घेण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे. रात्रभर आग विझविण्याचे काम सुरूच होते. या आगीत दोन जण यापूर्वीच ठार झाल्याचे जाहीर करण्यात आले असतानाच आणखी एकाचा मृत्यू झाल्याचेही निष्पन्न झाले आहे. मृताची ओळख अद्याप पटू शकलेली नाही. तसेच अजून अनेकजण बेपत्ता असावेत असाही अंदाज आता वर्तविण्यात आला आहे.

आगीचे वृत्त समजताच अग्नीशमन दल आणि नौसैनिकांनी केलेल्या झटपट हालचालींमुळे मंत्रालयातील सुमारे तीन हजार जणांची सुखरूप सुटका करण्यात यश मिळाले होते. आग आता शमली असली तरी इमारत पूर्ण थंड करण्यासाठी आणखी ४८ तास जावे लागतील असे सांगण्यात आले आहे. त्यानंतर इमारतीच्या स्ट्रक्चरल ऑडिटचे आदेश मुख्य सचिवांनी पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत.

इमारतीत अजून आत जाणे अशक्य असून येथील वीजपुरवठाही सुरळीत झालेला नाही. विजेच्या तारांत पाणी गेले असल्याचे वीजपुरवठा सुरळीत करायला आणखी अवधी लागणार आहे. आग तपासणी प्रकरणी गुन्हा अन्वेषण विभागाला तपासाचे आदेश दिले गेले असले तरी विरोधी पक्षांनी या मागे घातपात असावा असा संशय व्यक्त करून स्वतंत्र चौकशी आयोग नेमण्याची मागणी केली आहे. या आगीत आदर्श घोटाळा तसेच अन्य घोटाळ्याची कागदपत्रे जळून गेल्याचे सांगितले जात असले तरी सीबीआयने आदर्श घोटाळ्याची कागदपत्रे त्यांच्या ताब्यात असल्याचा खुलासाही केला आहे. मात्र तेवढ्यावरून विरोधकांचे समाधान झालेले नाही.

Leave a Comment