विराट रामायण मंदिराचे भूमिपूजन संपन्न

बिहार-पूर्व चंपारण्य जिल्ह्यात सुमारे १०० एकरांचा परिसरात बांधण्यात येत असलेल्या जगातील सर्वात मोठ्या राममंदिराचे भूमीपूजन बुधवारी संपन्न झाले. महावीर मंदिर ट्रस्टचे आचार्य किशोर कुणाल यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की ३०० कोटी रूपये या बांधकामासाठी खर्च येणार असून देश विदेशातील भाविक आणि हितचितकांच्या योगदानातून ही मंदिर उभारणी केली जात आहे. विराट रामायण मंदिर असे या मंदिराचे नाव निश्चित करण्यात आले आहे.

राम आणि सीता विवाहानंतर जनकपुरीतून अयोध्येकडे जात असताना या जागी थांबले होते असे उल्लेख आहेत. त्यामुळे या जागेतच या भव्य मंदिराची उभारणी केली जात आहे. कंबोडियातील अंगोर वट आणि रामेश्वर व मदुराईतील मंदिरांच्या धर्तीवर हे बांधकाम केले जात आहे. पाच मजली मंदिराला १८ कळस आणि १८ गर्भगृहे असून पैकी ६ गर्भगृहे ही दक्षिणेतील मंदिरांची प्रतिकृती असतील. मुख्य मंदिर १२४० फूट लांब, ११५० फूट रूंद आणि २७० फूट उंच आहे. राम सीता, लव कुश आणि वाल्मिकी ऋषींच्या मूर्ती या मंदिरात बसविल्या जाणार आहेत.

अहमदाबादचे प्रसिद्ध वास्तुरचनाकार पियुष सोमपुरा यांनी या मंदिराचा आराखडा तयार केला असून या मंदिराच्या उभारणीसाठी ७ ते ८ वर्षांचा कालावधी लागणार आहे.

Leave a Comment