
मुंबई दि.२२- काल दुपारी मुंबईतील शासकीय इमारत मंत्रालयाला लागलेल्या प्रलंयकारी आगीचे तांडव शांत करण्यात अग्नीशमन दलाला यश आले असून आता ही इमारत थंड करण्याचे काम हाती घेण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे. रात्रभर आग विझविण्याचे काम सुरूच होते. या आगीत दोन जण यापूर्वीच ठार झाल्याचे जाहीर करण्यात आले असतानाच आणखी एकाचा मृत्यू झाल्याचेही निष्पन्न झाले आहे. मृताची ओळख अद्याप पटू शकलेली नाही. तसेच अजून अनेकजण बेपत्ता असावेत असाही अंदाज आता वर्तविण्यात आला आहे.