पालखी मार्गावरील ८०० पाणीस्रोताची तपासणी

पंढरपूर दि.२२ – आषाढी एकादशीनिमित्त संतांच्या पालख्या पंढरपुरकडे येऊ लागल्या असून भाविकांना पिण्याचे स्वच्छ पाणी मिळावे म्हणून पंचायत समितीच्यावतीने पालखी मार्गावरील ८०० ठिकाणचे पाणी शुध्द करण्यात आले आहे. तसेच भाविकांना चांगल्या आरोग्यसुविधा देण्यासाठी २१० आरोग्य कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती पंचायत समितीचे आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले यांनी दिली.

श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरू श्रीसंत तुकाराम महाराज, श्रीसंत निवृत्ती महाराज, श्रीसंत मुक्ताबाई, श्रीसंत गजानन महाराज, श्रीसंत एकनाथ महाराज, श्रीसंत सोपानकाका आदी संतांच्या पालखी सोहळ्याबरोबर लाखो भाविक पंढरपुराकडे येत आहेत. पालखी मार्गावर भाविकांना स्वच्छ पाणी व आरोग्यसुविधा मिळाव्यात म्हणून तालुका पंचायत समितीने यंत्रणा सज्ज ठेवली आहे. पालखी मार्गावरील ३५९ विहिरी, २८० हातपंप, ३१ नळ योजना, ६० बोअर, ४५ हौद, २९ आड अशा ८०४ ठिकाणी औषधे टाकून पाणी शुध्द करण्यात आले आहे. पालखी मार्गावर सहा फिरती वैद्यकीय पथके नियुक्त करण्यात येणार असून प्रत्येक पथकात वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, औषधे आणि अॅम्ब्युलन्स असेल.

Leave a Comment