नेहा धुपिया `जुली’चा सिक्वेलमध्ये

अभिनेत्री नेहा धुपियाला `जुली’  चित्रपटातील बोल्ड आणि कसदार भूमिकेने बरीच लोकप्रियता मिळवून दिली. त्यामुळे ती आता या चित्रपटाचा सिक्वेल करण्याच्या विचारात आहे. एक-दोन वर्षांत ती तो नक्कीच करणार आहे.

नेहा धुपियाने `मिस इंडिया’चा किताब जिंकल्यानंतर लगेचच बॉलिवूड चित्रपटांच्या ऑफर स्वीकारण्यास सुरवात केली. तिचा अभिनय असलेला `कयामत : सिटी अंडर थ्रेट’ हा चित्रपट तिकीट बारीवर ठिकठाकच चालला. मात्र, २००४ मध्ये प्रसिद्ध झालेल्या `जुली’ चित्रपटाने तिला मोठी लोकप्रियता मिळवून दिली. शरीर विक्रय करणार्‍या तरुणीची तिने साकारलेली भूमिका विशेष गाजली.

नेहा त्याबाबतच बोलताना म्हणाली, `जुली’चा दुसरा भाग करायला मला नक्कीच आवडेल. पण, इतक्यात तो मी करणार नाही. तर, येत्या एक- दोन वर्षांत हा चित्रपट मी करेन. सध्या माझ्याकडे अनेक चित्रपट आहेत. शिवाय त्यातल्या माझ्या भूमिकाही वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. या चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत मी आहे. हे चित्रपट झाले, की मी `जुली’कडे वळेन.

नेहाचे हिंदी चित्रपटसृष्टीत साधारणपणे आठ वर्षांपूर्वी पदार्पण झाले. ’एक चालीस की लास्ट लोकल’, `मिथ्या’, `देसविदानिया’, `फस गये रे ओबामा’ आणि `डिअर फ्रेंड हिटलर’ असे अनेक चित्रपट तिने केले. त्याबाबत ती म्हणते, या क्षेत्रात माझा कोणी गॉडफादर नव्हता. त्यामुळे तू हा चित्रपट कर अथवा करू नको, असे सांगणारे कोणी नव्हते. मी फार समाधानी नाही, पण मी आनंदी आहे. मला असे वाटते, की सध्या जो कोणी चित्रपट करतो, तो चित्रपट चालणे हा त्या व्यक्तीचा स्वत:चा चमत्कार असतो. मी माझी कोणाशीही तुलना करत नाही. चांगले कथानक असलेला चित्रपट करण्याची माझी इच्छा आहे, असेही नेहा या वेळी म्हणाली.

Leave a Comment