`धूम-३’ मध्ये आमिर खानबरोबर रजनीकांत?

यशराज फिल्म्सची `धूम-३’ ही फिल्म शुटिंग सुरू होण्यापूर्वीच चर्चेत आहे. `धूम’ आणि `धूम-२’ हे दोन्ही सिक्वेल्स अतोनात गाजले होते. पहिल्या भागात जॉन आब्रहमचा स्टायलिश व्हिलन, बाइक्सचा थरार आणि धूम-२ मध्ये हृतिक रोशनचा जबरदस्त `चोर’, त्याचे लूक्स, अभिनय आणि ऐश्वर्यासोबतची केमिस्ट्री यामुळे प्रेक्षकांचे पुरेपूर मनोरंजन झाले होते. त्यामुळे आगामी `धूम-३’ त्याहून सरस असणार का याची चर्चा आहे. अर्थात या सिनेमात अमिर खान असल्यामुळे हा सिनेमा चांगलाच गाजणार यात शंकाच नाही.

मात्र, आता धूम-३ बद्दल नवीनच चर्चा ऐकायला मिळत आहे. असे सांगण्यात येत आहे की या सिनेमात साऊथचा सुपरस्टार रजनीकांतही झळकणार आहे. रजनीकांत `धूम-३’मध्ये असावा, अशी आमिर खानचीच इच्छा आहे. त्यामुळे रजनी आणि गझी दोघेही `धूम-३’मध्ये दिसण्याची शक्यता आहे.

सूत्रांनी सांगितले, `रजनी सरांची क्रेझ अतिप्रचंड आहे. बॉलिवूडच्या कुठल्याही अभिनेत्याला रजनीकांत यांच्या लोकप्रियतेशी स्पर्धा करता येऊ शकत नाही. रजनीकांत भारतातच नव्हे, तर भारताबाहेरही लोकप्रिय आहेत. तसेच पडद्यावर त्यांची स्टाइल आणि ते करत असलेल्या करामती भन्नाट अहेत. त्यामुळे आमिर खानची इच्छा आहे की रजनीकांत यांनीही `धूम-३’ सिनेमाचे घटक बनावे. आमिर खान रजनीकांत यांचा मोठा फॅन आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करण्यासाठी आमिर आतुर आहे.’

आमिर खान रजनीकांत यांचा फॅन आहे, यात काही शंकाच नाही. पण, रजनीकांतबरोबर काम करण्यामागे त्याचा दुसरा कुठला उद्देश तर नाही ना! कारण रा.वनमध्ये शाहरुखच्या आग्रहाखातर रजनीकांत यांनी विशेष भूमिका साकारली होती. आता शाहरुखएवढाच मान आपल्याला मिळावा, किंबहुना त्याहुन जास्त मिळावा, यासाठी तर आमिर खानचा रजनीकांत यांना आपल्याबरोबर घेण्याचा आग्रह नाही ना, अशी चर्चाही सिनेवर्तुळात रंगली आहे.    

Leave a Comment