रिलायन्सने विमल विकली

मुंबई दि. २२- धीरूभाई अंबानींच्या रिलायन्सला भारतीय जनमनात चेहरा मिळवून देणारी विमल विकण्यात आली असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. खासगी क्षेत्रातील अग्रणी उद्योगसमूह असलेल्या रिलायन्सने त्यांचा टेक्स्टाईल उद्योग विकण्याचा निर्णय घेतला होता व त्याचाच परिपाक म्हणून विमल ब्रँड विकण्यात आला आहे.

साधारण ८० च्या दशकात जेव्हा भारतीय दूरदर्शन केवळ एकच नॅशनल चॅनेल दाखवित होते तेव्हा रिलायन्सने त्यांच्या विमल ब्रँड साठी राबविलेली ओन्ली विमलची जबरदस्त जाहिरात मोहिम आजही अनेकांच्या स्मरणात आहे. दूरदर्शन वरून सातत्याने झळकणार्‍या या जाहिरातीची प्रेक्षक प्रतिक्षा करत असत. मुख्य  कार्यक्रमांपेक्षा तेव्हा या जाहिरातीचेच कुतुहल अधिक होते. घराघरात त्याकाळात विमल पोहोचली होतीच पण रिलायन्सला जेव्हा त्यांच्या भांडवल वृद्धीसाठी शेअर मार्केटटमध्ये उतरण्याची वेळ आली तेव्हा हाच विमलचा चेहरा घेऊन ते शेअर मार्केट मध्ये उतरले होते. विशेष म्हणजे तेव्हा आजच्यासारखी शेअर गुंतवणूक केली जात नव्हती. फारच थोडे नागरिक शेअर खरेदी करत असत.

विमलच्या जाहिराती करण्याचे काम होते मुद्रा कम्युनिकेशन्सकडे. मुद्रानेही आपली कल्पकता पणाला लावून त्याकाळात सूटींगशर्टिंगसाठी नामवंत असलेल्या रेमंडस तर साड्याविश्वात नाव कमावलेल्या गार्डन या दोन बड्या कंपन्यांशी स्पर्धा करून विमल घराघरात नेली होती. व्हिव्हियन रिचर्डस आणि अॅलन बॉर्डरसारख्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंना आपल्या जाहिरातीत झळविण्याचा पराक्रमही विमलने केला होता. तर आंतरराष्ट्रीय वर्ल्ड कप वन डे क्रिकेट मॅचेसची स्पॉन्सरशीपही रिलायन्सने मिळविली होती. त्या वर्षाच्या वर्ल्ड कप रिलायन्स कप म्हणूनच दिला गेला होता आणि त्यानंतर वर्ल्ड कपचे नावासाठीचे हक्क विकणे बंदच झाले होते.

आता ही विमल रिलायन्सचे आपले माहेर सोडून सासरी गेली आहे मात्र ती कुणी घेतली याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.

Leave a Comment