संगमाविरुद्ध प्रणवदा

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतील डावपेच आता एका निर्णायक वळणावर आले आहेत. या  निवडणुकीत काही चुरस नाही, ती एकतर्फी होणार असे म्हटले जात होते पण आता ती निदान रंगतदार तरी होणार असे स्पष्ट झाले आहे. स्पष्ट अशाकरिता म्हणता येईल की, एका बाजूला कॉंग्रेसचे उमेदवार ठरले आहेत, तर दुसर्‍या बाजूला सर्वात मोठा विरोधी पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीला आजवर सक्षम उमेदवार मिळत नव्हता तो मिळाला आहे. आजवर संगमांना मोठा पक्ष मिळत नव्हता आणि भाजपा या मोठ्या पक्षाला उमेदवार मिळत नव्हता. या दोघांचा योग जुळून आला आहे. भाजपाचा उमेदवार असा का असेना पण निश्‍चित झाला आहे. हा उमेदवार निश्‍चित करताना भारतीय जनता पार्टीपुढे अनेक समस्या उभ्या राहिल्या, काही वेळा भाजपाची गोची सुद्धा झाली. मात्र या निवडणुकीच्या एका पायरीवर संगमा यांच्याकडे ढुंकून सुद्धा न पाहणार्‍या भारतीय जनता पार्टीला संगमा यांच्या उमेदवारीचे समर्थन करणे भाग पडले. नाईलाजाने का होईना पण हे घडले. अन्यथा भाजपाचा ओढा डॉ. अब्दुल कलाम यांच्याकडे होता. आता त्यांनी संगमा यांना आपली पसंती दिली आहे.

संपु आघाडीतल्या तृणमूल आणि सपा या दोन घटक पक्षांनीही कॉंग्रेसच्या उमेदवाराच्या मागे उभे न राहता डॉ. कलाम यांच्याच नावाचा आग्रह धरला होता. त्यामुळे भाजपानेही त्यांनाच गळ घालायला सुरूवात केली होती. त्यामुळे आपल्याला डॉ. कलाम यांच्यासारखा समर्थ उमेदवारही मिळतो आणि संपु आघाडीमध्ये एक छोटीशी फूट पाडल्याचे समाधान सुद्धा मिळते, अशी भाजपा नेत्यांची भावना झाली होती. परंतु डॉ. कलाम  असे कोणाच्या डावाचे बळी होण्यास तयार नव्हते. निवडून येण्याची शक्यता किंवा अविरोध निवड यापैकी एक त्यांना हवे होते. पण तसे काही आश्‍वासन त्यांना मिळेना म्हणून यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला आणि भारतीय जनता पार्टीसमोर एकही समर्थ उमेदवार नाही अशी अवस्था निर्माण झाली. भाजपाची गोची झाली. डॉ. कलाम यांच्या नावाचा आग्रह धरणार्‍या ममता बॅनर्जी यांचे सुद्धा डावपेच कोसळले. आता या मंडळींना कॉंग्रेसच्या प्रणव मुखर्जी यांच्या निदान जवळपास जाणारा तरी उमेदवार देता येईल की नाही, अशी शंका उपस्थित व्हायला लागली. कारण निवडणुकीच्या रिंगणामध्ये सक्रियरित्या संगमा, मुखर्जी आणि कलाम अशी तीनच नावे राहिली होती.

बाकीची नावे चर्चेला येऊन मागे पडली होती. परिणामी कलाम यांनी नकार देताच भारतीय जनता पार्टीने बुडता बुडता संगमा यांच्या काडीचा आधार घेतला आणि आता कॉंग्रेसचे प्रणवदा विरुद्ध भाजपाचे संगमा असा सामना निश्‍चित झाला. खरे म्हणजे भारतातले राजकारण काही दोन ध्रुवांभोवती केंद्रित झालेले नाही. त्यामुळे अमेरिकेतल्या अध्यक्षांच्या निवडणुकीप्रमाणे दोन उमेदवार निवडले की निवडणूक स्पष्ट होत नाही. भारतात  तिसरी राजकीय शक्ती अस्तित्वात आहे. या डाव्या आघाडीचे उमेदवार कोण आहेत, याचा निर्णय अद्याप झालेला नाही. या आघाडीच्या डोळ्यासमोर सक्षम उमेदवार सुद्धा नाही. परंतु जसा मिळेल तसा एखादा उमेदवार त्यांनी जाहीरच केला तर ही लढत तिरंगी होण्याची शक्यता आहे. मात्र ती कशी तिरंगी होईल आणि ती किती रंगतदार होईल हे सारे डाव्या आघाडीचा उमेदवार जाहीर झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. तूर्तास तरी प्रणव मुखर्जी आणि पी.ए. संगमा हे दोन सक्षम दावेदार मैदानात उतरले आहेत. भारतीय जनता पार्टीने पी.ए. संगमा यांचे समर्थन केले असले तरी त्यांच्या आघाडीत याबाबत एकमत दिसत नाही. शिवसेनेने तर उघडपणेच पी.ए. संगमा यांना विरोध केला आहे आणि आपले वजन प्रणव मुखर्जी यांच्या पारड्यात टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

अकाली दल आणि जनता दल (यु) या दोन घटक पक्षांच्या भूमिका अजून निश्‍चित नाहीत. म्हणजे संगमा यांच्या उमेदवारीला भाजपाचा पाठींबा आहे, पण भाजपा प्रणित रालो आघाडीचा एकमुखी पाठींबा नाही. मग भारतीय जनता पार्टीचे राजकारण चुकले आहे का, असा प्रश्‍न निर्माण होतो. समर्थ आणि निश्‍चित स्वरुपाचा उमदेवार नसणे यातून भाजपाची स्थिती उघड झाली आहेच. पण तरी सुद्धा संगमा यांच्या उमेदवारीला पाठिंबा देण्यातून आपल्या हाती काही राजकीय लाभ येईल असे भाजपाच्या नेत्यांना वाटते. कारण संगमा यांच्या उमेदवारीला बिजू जनता दलाचे नेते नवीन पटनायक आणि अद्रमुक नेत्या जयललिता यांचा पाठींबा आहे. म्हणजे संगमा यांच्या उमेदवारीतून भाजपाला जयललिता आणि पटनायक यांच्याशी जवळीक साधता येणार आहे. वेळ पडल्यास ममता बॅनर्जी सुद्धा भाजपाच्या जवळ येऊ शकतात. त्यामुळे २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीचा विचार केला तर भाजपाकडून काही गोष्टी फायदेशीर घडणार आहेत, असे दिसत आहे. कारण संगमा यांच्या उमेदवारीमुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये सुद्धा फूट पडली आहे. भाजपाने या निमित्ताने काही नवी जमवाजमव करण्याचा प्रयत्न केला आहे कारण राजकीय अस्थिरतेच्या  काळात जयललिता उपयोगी पडत असतात.