नवी दिल्ली दि. २२ – पुढच्या महिन्यात होणार्या लंडन ऑलिम्पिक २०१२ साठी भारत संघाकडून पुरुष दुहेरी प्रकारात दोन संघ पाठविणार असल्याची अधिकृत घोषणा गुरुवारी अखिल भारतीय टेनिस संघटनेकडून करण्यात आली. नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत संघटनेचे अध्यक्ष अनिल खन्ना यांनी माहिती दिली.
गेले काही दिवस भारतीय टेनिस वर्तुळात महेश भुपती आणि रोहन बोपण्णा यांनी लिएंडर पेस सोबत खेळण्यास नकार दिल्याने वादळ निर्माण झाले होते; या निर्णयाने संघटनेकडून हे वादळ शमविण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसत आहे. आता लंडन ऑलिम्पिक २०१२ साठी भारताकडून पुरुष दुहेरीमध्ये दोन वेगवेगळे संघ जाणार आहेत. या दोन संघांमधील पहिल्या संघात लिएंडर पेस आणि विष्णू वर्धन यांची जोडी तर दुसर्या संघात महेश भूपती आणि त्याचा साथीदार रोहन बोपण्णा अशा दोन जोड्या असणार आहे.
मिश्र दुहेरीत लिएंडर पेस आणि सानिया मिर्झा भारताचे प्रतिनिधीत्व करतील. संघटनेचा हा निर्णय जागतिक क्रमवारीत ७ व्या क्रमांकावर असलेल्या पेसची अवहेलना केल्यासारखाच आहे. ‘सध्याच्या परिस्थितीत दोन संघ पाठवणे हाच आमच्यासमोर योग्य पर्याय होता.‘ देशाची गरज आणि गेली २० वर्ष डेव्हिस चषक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार्या खेळाडूंचा विचार करूनच आम्ही हा निर्णय घेतला, असे खन्ना म्हणाले.