भाजप, अकाली दल संगमांना पाठिंबा देण्याच्या मनस्थितीत

नवी दिल्ली दि.२१ – राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवाराच्या नावावर मतैक्यासाठी ‘एनडीए’ झगडत असतानाच भाजप आणि शिरोमणी अकाली दल या दोन महत्त्वाच्या घटक पक्षांचा कल राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा दिलेले लोकसभेचे माजी सभापती पी. ए. संगमा यांना पाठिंबा देण्याकडे असल्याचे आज स्पष्ट झाले. संगमा यांना भाजपचा पाठिंबा आज दिवसभरात जाहीर केला जाण्याची शक्यता असल्याचे पक्षावह ज्येष्ठ नेते सुषमा स्वराज यांनी सांगितले.मात्र, एनडीएतील अन्य घटक पक्ष संगमांच्या नावाला पाठिंबा देतील काय हा खरा प्रश्न आहे.

संयुक्त जनता दलाने ‘यूपीए’चे उमेदवार प्रणव मुखर्जी यांच्याविरोधात उमेदवार उभा करण्यास तीव्र नापसंती व्यक्त केली असून त्यांच्या पक्षाचीही आजच बैठक होऊन त्यात अंतिम निर्णय घेतला जाईल, असे राजकीय निरीक्षकांनी म्हटले आहे. शिवसेनेने संगमांच्या नावाला विरोध व्यक्त करून मुखर्जींना पाठिंबा देण्याची घोषणा या आधीच केली आहे.

संगमा यांच्या नावाला सर्वांत महत्त्वाचा मानला गेलेला पाठिंबा म्हणजे अण्णाद्रमुकचा! पक्षाध्यक्षा जयललिता यांनी संगमांना पाठिंबा जाहीर केला आहे, कलाम यांनी नकार दिल्याने ममता बॅनर्जी या संगमांना पाठिंबा देतील असा जयललिता यांचा तर्क होता. तथापि, ममतानी प्रणव मुखर्जींना पाठिंबा जाहीर केल्याचे वृत्त असल्याचे समजते.

राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा देताना राष्ट्रवादी काँग्रेसला या देशातील आदिवासींच्या आशा-आकांक्षाची काहीच किंमत नाही, असा संगमानी आरोप केला होता. तर राजकीय सूत्रांच्या मते संगमा यांच्या कन्या अगाथा संगमा यांनी जर आपल्या पित्याचा प्रचार केल्यास त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळाचा राजीनामा देण्यास सांगितले जाण्याची शक्यता आहे.

राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीवर बहिष्कार घालण्यावरून डाव्या पक्षांतही मतभेद निर्माण झाले असून अंतिम निर्णय लवकरच अपेक्षित आहे. मुखर्जींना पाठिंबा देण्यास माकप अनुकूल आहे. मात्र, अन्य पक्षांनी तसा कोणताही शब्द दिला नाही.

Leave a Comment