ऐतिहासिक घड्याळ्याची टिकटिक सुरू

पुणे दि.२१- तब्बल साठ वर्षांनंतर पुणे महापालिकेत रामकृष्ण परमहंसांचे चित्र असलेले ऐतिहासिक घड्याळ पुन्हा विराजमान होत असून बंद पडलेले हे घड्याळ पुण्यातील तज्ञ दिनेश देशपांडे यांनी पुन्हा सुरू करण्यात यश मिळविले आहे. स्थायी समितीचे सहआयुक्त ज्ञानेश्वर मुळक यांनी त्यासाठी फार परिश्रम घेतले आहेत.

महात्मा गांधीजींनी स्वराज्याची हाक दिल्यानंतर ब्रिटीश वसाहतवादाच्या विरोधाचे निशाण म्हणून हे घड्याळ बनविले गेले होते. साडेपाच फूट उंचीच्या या घड्याळावर रामकृष्ण परमहंसांचे चित्र आहे. तसेच उत्पादकाचे नांव व स्वदेशी इलेक्ट्रिक क्लॉक कंपनी असाही उल्लेख आहे. मुंबईच्या गिरगांव भागातील घड्याळ्यांचे उत्पादक कृष्णनाथ नरवणे यांनी अशा घड्याळ्यांचे उत्पादन केले होते आणि हे घड्याळ बनविले होते मारूती जोशी या इलेक्ट्रिक इंजिनिअर असलेल्या तज्ञाने. या जोशी यांची रामकृष्ण परमहंसांवर नितांत श्रद्धा होती. जोशी यांनी आयुष्यभर रामकृष्णांच्या विचारांचा प्रचार करण्याचे काम केले होते.

उत्पादक नरवणे यांचे नातू जी.के.कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार अशी आणखी दोन घड्याळे चालू अवस्थेत आहेत. पैकी एक लंडनमध्ये आहे तर दुसरे हरद्वार येथील हरि की पौडी येथे आहे.

सहआयुक्त ज्ञानेश्वर मुळक यांना २००८ सालातच या घड्याळ्याची स्थिती लक्षात आली होती. त्याचे महत्त्वही त्यांना जाणवले होते. त्यांनी ६५ हजार रूपये पदरमोड करून हे घड्याळ दुरूस्त करविले.तसेच हे घड्याळ त्याकाळच्या विश्रामबाग येथे असलेल्या पालिकेत असावे असा अंदाज बांधून चौकशी सुरू केली. तेव्हा  माजी सहआयुक्त किनकर यांच्याकडून त्यांना हे घड्याळ गेली साठ वर्षे बंद अवस्थेत असल्याचे समजले. महात्मा गांधींनी स्वदेशी चळवळीची हाक दिल्यानंतर नरवणे यांनी अशी २०-३० घड्याळे तयार केली होती व नंतर १९५० साली त्यांनी कारखाना बंद केला होता असेही समजते.

मुळक यांनी आज म्हणजे गुरूवारी हे घड्याळ महापालिका आयुक्त महेश पाठक यांच्याकडे सुपूर्द केले असून महापालिकेत पुन्हा एकदा या घड्याळ्याची टिकटिक ऐकू येणार आहे.

Leave a Comment