अहमदाबादेत उत्साहात रथयात्रा सुरू

अहमदाबाद दि.२१- गुरूवारी सकाळी चारशे वर्षे चालत आलेल्या परंपरेनुसार येथे जगन्नाथ रथयात्रेची सुरवात मोठ्या उत्साहात झाली. मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी रथ जाणार्‍या असलेल्या मार्गाची प्रतीकात्मक सफाई करून या वार्षिक रथयात्रेचा शुभारंभ केला. रथयात्रेदरम्यान कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली असून भगवान जगन्नाथ, भगवान बलदेव व देवी सुभद्रा यांचे रथ मार्गस्थ झाले. मुख्यमंत्री नरेंद्र मोदी रथ ओढण्यातही सहभागी झाले होते. जगन्नाथ पुरीनंतर देशातील दुसर्‍या नंबरचे आकर्षण असलेल्या या रथयात्रेत सामील होण्यासाठी हजारो साधू अहमदाबादेत जमले आहेत असे समजते.

यात्रेला सुरवात करताना मुख्यमंत्र्यांनी यंदाही गुजराथेत चांगला पाऊस होऊ दे आणि गुजराथचा सर्वच क्षेत्रात वेगाने विकास होऊ दे, राज्यात शांतता, एकता आणि सद्भावना वाढीस लागू दे असे गार्‍हाणे भगवान जगन्नाथाला घातले. १४ किलोमीटरचे मार्गक्रमण करणारी ही यात्रा शहराच्या कलापूर, प्रेम दरवाजा, दिल्ली चकला, दर्यापूर ,शहापूर अशा अनेक संवेदनशील भागातून जाणार आहे. त्यासाठी २० हजार पोलिस, होमगार्ड, निमलष्करी दले, एसआरपी यांची नियुक्ती रथयात्रा मार्गावर करण्यात आली आहे. यंदा प्रथमच या यात्रेत जीपीएस व छुपे कॅमेरे बसविण्यात आले असल्याचेही सांगण्यात आले.

Leave a Comment