नाशिक-सिन्नर महामार्गाच्या चौपदरीकरणाची प्रक्रिया सुरू

नाशिक, दि. २० – नाशिक-सिन्नर महामार्गाच्या चौपदरीकरणासह सिन्नर बायपासच्या सुमारे पंचवीस किमी अंतराच्या महामार्गाला केंद्र सरकारच्या कॅबिनेट उपसमितीची मंजूरी मिळाली असून, या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. पुढील सहा महिन्यात या कामास सुरूवात होणार असून, येत्या दोन वर्षात तो पूर्ण केला जाईल, अशी माहिती खासदार समीर भुजबळ यांनी दिली.

केंद्राच्या नवीन पथकर धोरणानुसार तयार केला जाणार हा पहिलाच रस्ता असून जिल्हयात नोंदणी झालेल्या वाहनांचा पथकरात सवलत दिली जाणार आहे. या मार्गावरील प्रस्तावित शिंदे पथकर नाक्याच्या वीस किलोमीटर त्रिज्येच्या क्षेत्रात राहणार्‍या वाहनधारकांना सवलतीच्या दरात मासिक पासची सुविधा मिळणार आहे. नाशिक रोड ते शिंदे गावादरम्यान दोन्ही बाजुला समांतर रस्ते बांधण्यात येणार आहे. या महामार्गावर प्रमुख चाकांमध्ये सहा भुयारी मार्ग तर संपूर्ण रस्त्यावर एकूण सहा पादचारी भुयारी मार्ग राहतील, असे खासदार भुजबळ यांनी सांगितले. केंद्राच्या पर्यावरण विभागाने या प्रकल्पास तत्वतः मंजुरी दिली असून मोहदरी घाटातील वनजमिनींचे भुसंपादन हस्तांतरणासही केंद्राच्या वन विभागाने तत्वतः मान्यता दिली आहे.

Leave a Comment