लंडन ऑलिंपिकमधून माघार घेण्याची पेसची धमकी

नवी दिल्ली, २१ जून –  क्रमवारीत खालच्या स्थानावर असलेल्या खेळाडूसोबत खेळावे लागल्यास लंडन ऑलिंपिकमधून माघार घेऊ अशी धमकी टेनिसपटू लिअँडर पेसने मंगळवारी दिली आहे.

लंडन ऑलिंपकमध्ये दुहेरीसाठी टेनिसपटूंच्या निवडीची यादी ठरवण्याची २१ जून ही अंतिम तारीख आहे. पेस सोबत खेळण्यास महेश भूपती आणि रोहन बोपण्णा या दोघांनीही नकार दिल्यानंतर आता पेसने ऑलिंपिक स्पर्धेतून माघार घेण्याची धमकी दिली आहे.

जर महेश आणि रोहन या दोघांना माझ्यासोबत खेळायचे नसेल, तर देशासाठी मला क्रमवारीत त्यांच्यानंतर असलेल्या खेळाडूसोबत खेळण्यास आनंद झाला असता. मात्र भारतीय टेनिसपटूंमध्ये माझी क्रमवारी सर्वोत्तम असले तर माझा जोडीदार म्हणून मला उत्तम टेनिसपटू दिला पाहिजे. तरच देशासाठी पदक मिळवता येईल असे पेसने म्हटले आहे.

गुरुवारी होणार अंतिम निर्णय
लंडन ऑलिंपिकसाठी पुरुष दुहेरीच्या जोड्या कशा असतील हे गुरुवारी (२१ जून) निश्चित होणार आहे. कारण आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाकडून टेनिसपटूंच्या निवडीची यादी ठरवण्याची ही शेवटची तारीख आहे. ते पाहता पेस-भूपती किंवा पेस-बोपण्णा याबाबतचा ठोस निर्णय अखिल भारतीय टेनिस संघटनेला (एआयटीए) घ्यावाच लागेल. त्यातच लिअँडर पेससोबत खेळण्यास महेश भूपतीपाठोपाठ रोहन बोपण्णानेही नकार दिल्याने काय करावे, या पेचात एआयटीए पडला आहे. हे तीनही टेनिसपटू सध्या लंडनमध्ये असले तरी एआयटीए सातत्याने त्यांच्या संपर्कात आहे.

भूपती-बोपण्णा हे त्यांचा निर्णय मागे घ्यायला तयार नसल्याचेही सूत्रांकडून समजते. त्यामुळे पेससोबत अननुभवी टेनिसपटू देण्यावाचून एआयटीएसमोर पर्याय नसल्याचे कळते. असे झाल्यास विष्णू वर्धन किंवा युकी भांब्रीला संधी मिळू शकते. एआयटीएकडे जास्त पर्याय उपलब्ध नसल्यानेच ते याप्रकरणावर तोडगा काढू शकत नाहीत. लंडन ऑलिंपिकपासाठी भारताकडून दोन पुरुष दुहेरीच्या जोड्या पाठवण्यासाठी परवानगी असताना एआयटीएने मात्र भूपती-पेस ही एकच जोडी पाठवण्याचे जाहीर केले.

कृष्णा यांची मध्यस्थी
पेस आणि भूपती यांनी आपआपसातील वाद विसरून देशहितासाठी एकत्र यावे, असे आवाहन परराष्ट्र मंत्री एस. एम. कृष्णा यांनी केले आहे. कृष्णा हे ‘एआयटीए’चे मानद अध्यक्ष आहेत. ‘‘भारताचे हित ध्यानात घेणे महत्वाचे आहे त्यासाठी त्यांनी आपआपसातील वाद बाजूला ठेवावेत. या वादांमुळे भारताची प्रतिष्ठाही धोक्यात येत असते. एआयटीएचे अध्यक्ष अनिल खन्ना यांनी या तीनही टेनिसपटूंना प्रत्यक्ष भेटून वाद सोडवावा,’’ असे कृष्णा यांनी म्हटले आहे.

Leave a Comment