राष्ट्रवादीतील ओबीसी नेत्यांवरील आरोपांबाबत श्रेष्ठींचे मौन

मुंबई, दि. २० – राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन मंत्र्यांवर गेल्या आठवडाभरात होत असलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर पक्षातून कोणतीच प्रतिक्रिया व्यक्त केली जात नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

शेकापचे जयंत पाटील यांनी, जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांच्यावर बेहिशोबी मालमत्ता जमवल्याचा आरोप केला आहे. तर धर्मराज्य पक्षाने त्यांच्याविरोधात याचिका दाखल केली आहे. दुसरीकडे टोलनाक्यांच्या प्रश्नावर मनसेने सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांना लक्ष्य केले आहे. पक्षातील मंत्र्यांवर विरोधकांकडून आरोप होत असताना प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनी मात्र मौन बाळगले आहे. हे दोन्ही मंत्री ओबीसी समाजाचे असल्यानेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेतृत्व त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे बोलले जात आहे.

सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्यावर मुंबई एज्युकेशन ट्रस्ट या संस्थेचा वापर अशैक्षणिक कामासाठी केल्याचा आरोप करण्यात आला होता. या संकुलात भुजबळ यांनी अनेकदा पक्षाच्या बैठकांचे तसेच पत्रकार परिषदांचेही आयोजन केले होते. तरीही भुजबळ यांच्या बचावासाठी पक्षातील कोणीही पुढे आला नाही. आता तर मनसेनेही टोलनाक्यांच्या मुद्यावर भुजबळ यांना लक्ष्य केले आहे. हा विषय सरकारशी संबंधित असतानाही राष्ट्रवादी पक्षाकडून भुजबळ यांच्या समर्थनार्थ कोणतीच प्रतिक्रिया दिली जात नाही. 

जलसंपदामंत्री सुनिल तटकरे यांना, याआधी सिंचनाच्या श्वेतपत्रिकेच्या विषयावर लक्ष्य करण्यात आले. त्यानंतर शेकापसारख्या पक्षातूनही त्यांच्यावर वैयक्तिक आरोप केले गेले. तरीही राष्ट्रवादी काँग्रेसमधील कोणत्याही प्रवक्त्याने याविषयी बोलणे पंसत केले नाही. सुनिल तटकरे आणि छगन भुजबळ यांचे पक्षातील वाढते महत्त्व मराठा समाजातील मंडळींना मान्य नाही. ओबीसी विरूद्ध मराठा असा संघर्ष पक्षात निर्माण झाला आहे. त्यामुळेच पक्षातील नेत्यांवर आरोप होत असताना राष्ट्रवादीकडून त्याचे खंडन केले जात नसल्याचे बोलले जात आहे.

Leave a Comment