राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीवर डीएमडीकेचा बहिष्कार

चेन्नई  दि.२०-  येत्या १९ जुलै रोजी होणार्‍या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय डीएमडीकेने (देसिया मुरपोक्कू द्रविड कळघम) घेतला आहे.

पक्षाचे संस्थापक अध्यक्ष विजयकांत म्हणाले, की पाणी वाटपावरून तमिळनाडूचे शेजारील राज्याशी वाद आहेत. श्रीलंकेच्या नौदलाकडून येथील मच्छिमारांवर वारंवार कारवाई होत आहे. अनेकांना श्रीलंकेने बंदी बनवून ठेवले आहे. अशा आणि अन्य अनेक समस्यांना तमिळनाडूतील जनता तोंड देत आहे. या जनतेला न्याय देण्यासाठीच पक्षाने राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय आमच्या पक्षाने घेतला आहे.

तमिळ भाषा, तमिळनाडू आणि तमिळनाडूवासीयांकडे केंद्र सरकारकडून दुर्लक्ष होत आहे. कोणत्याही निवडणूक प्रक्रियेत हे राज्य उत्स्फूर्त सहभाग घेते. पण, त्यांचा वापर किती प्रमाणात केला जावा याला मर्यादा राहिलेली नाही.  त्यांच्या पदरी कायम निराशाच पडते, असेही विजयकांत या वेळी म्हणाले.