मान्सूनमध्ये खंड पडण्याची शक्यता कोकणात अतीवृष्टीचा इशारा

पुणे, दि. १९ – नैऋत्य मोसमी पावसाची स्थिती कायम असली तरी बदलेते हवामान आणि राज्यात ठराविक ठिकाणीच तयार होणारे कमी दाबाचे क्षेत्र यामुळे यंदाच्या मान्सूनमध्ये खंड पडण्याची शक्यता असल्याची माहिती पुणे वेधशाळेच्या संचालिका सुनिता देवी यांनी दिली आहे. तसेच कोकणात काही ठिकाणी अतीवृष्टीचा इशाराही वेधशाळेने दिला आहे.

पुणे, मुंबईसह सातारा, सांगली, कोल्हापूर येथे रविवारी मान्सूनने जोरदार हजेरी लावली. मात्र त्यानंतर उत्तरेकडील पच्छिम भागात हवामानात बदल झाल्याने मध्य महाराष्ट्रासह पच्छिम महाराष्ट्रातही कोरडे वारे वाहत आहे. त्यामुळे राज्यात पावसाचे ढग येत नसून ते कोकण परिसरात वळत आहेत. यामुळे मध्य महाराष्ट्रात पावसाला पुरक वातावरण तयार न झाल्यास मान्सूनमध्ये खंड पडण्याची शक्यता आहे. तसेच येत्या २२ जूनपासून सलग मान्सून पाऊस झाल्यास पुढील काळात खंड पडण्याची शक्यता नसल्याचेही देवी यांनी स्पष्ट केले आहे.

नैऋत्य मोसमी पावसाची वाटचाल कायम असून राज्यात कोकण परिसरात पावसाची शक्यता आहे. तसेच हवामान अनुकूल असल्यास पुढील दोन दिवसात मान्सून उत्तरेकडे सरकून अरबी समुद्र, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, पच्छिम बंगाल ओरिसा, तसेच गुजरात आणि छत्तीसगडच्या काही भागात दाखल होण्याची शक्यता असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे. येत्या ४८ तासात सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंद्धूदुर्ग, रायगड आदी परिसरात जोरदार पावसाची शक्यता आहे. तर पुणे, मुंबई परिसरात ढगाळ वातावरण असणार असून काही ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे.

 

 

Leave a Comment