
पुणे, दि. १९ – जूनचा पहिला पंधरवडा उलटूनही पावसाचा पत्ता नसल्याने यंदा शहरात पालख्यांचे स्वागतही कोरडेकोरडेच झाले. मान्सूनने पहिल्या दोन दिवसात जोरदार हजेरी लावली. मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे.

पुणे, दि. १९ – जूनचा पहिला पंधरवडा उलटूनही पावसाचा पत्ता नसल्याने यंदा शहरात पालख्यांचे स्वागतही कोरडेकोरडेच झाले. मान्सूनने पहिल्या दोन दिवसात जोरदार हजेरी लावली. मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे.
सध्या ढगाळ वातावरण असल्याने शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसले आहेत. तापमानही ३० अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले आहे. यंदा राज्यात मान्सूनचे वेळेवर आगमन थोडे उशिराच झाले. त्यामुळे राज्यातील पेरणीची कामेही रखडली आहेत. पुरेसा पाऊसच नसल्याने आतापर्यंत केवळ अवघ्या तीन टक्के पेरण्या झालेल्या आहेत.
राज्यातील एकूण खरिपाच्या क्षेत्रापैकी केवळ दोन ते तीन टक्के क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत. दरवर्षी आषाढी वारी सुरु होतानाच सुमारे ९५ टक्के पेरण्या पूर्ण झालेल्या असतात. या वर्षी मात्र जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यानंतर देखील कोकण वगळता राज्याचा उर्वरित भाग अद्याप कोरडाच आहे. पुणे जिल्ह्यातील पेरण्यांनी थोड्याफार प्रमाणात वेग घेतला आहे. विशेषत: भात लागवडीसाठीची संपूर्ण तयारी शेतकर्यांनी केली आहे. मात्र पाऊसच नसल्याने शेतकर्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. राज्यातील शेतकरी अद्यापही पेरणीलायक पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. पुणे जिल्ह्यातही शिरुर, इंदापूर, दौंड या तालुक्यांतील पेरण्या अद्यापही रखडलेल्याच आहेत.
पुणे जिल्ह्यातूनच सुरु होणार्या संतांच्या पालखी सोहळ्यात सामिल होण्यासाठी शेतकरी उत्सुक असतात. मात्र पेरण्याच मोठ्या प्रमाणात लांबल्याने वारीमध्ये सामिल होता आलेले नाही. त्यामुळे वारीत गर्दीही कमीच दिसते आहे. येत्या तीन-चार दिवसात पाऊस झाल्यास शेतकरी पेरण्या उरकून पुढे मार्गस्त झालेल्या पालख्यांमध्ये सामील होतील. त्यामुळे सध्या तरी सर्व शेतकरी पावसासाठीच विठूरायाकडे प्रार्थना करताना दिसत आहेत.