
डेहराडून, दि. २० – हिंदूधर्मीयांना अत्यंत पवित्र असलेल्या गंगा नदीचे पाणी देवप्रयाग या ठिकाणी आचमन करण्याच्या योग्यतेचे नसल्याचे एका संशोधनाअंती आढळून आले आहे. जलप्रदूषणासंदर्भात संशोधन करणार्या श्रीराम इन्स्टिट्यूट फॉर इंडस्ट्रीयल रिसर्च या संस्थेतर्फे गंगोत्री, देव्रपयाग, ऋषिकेश, हरिद्वार, कानपूर, अलाहाबाद, मिर्जापूर, वाराणसी, पाटणा आणि माल्दा अशा दहा ठिकाणच्या गंगाजलावर संशोधन करण्यात आले. त्यावेळी गंगा नदी विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषित असल्याची वस्तुस्थिती पुढे आली आहे. अनेक ठिकाणी गंगेचे पाणी वापरण्यायोग्य नसल्याचे; तसेच हे पाणी शेतीसाठीही उपयुक्त नसल्याचे या संशोधनातून स्पष्ट झाले आहे. श्रीराम इन्स्टिट्यूट फॉर इंडस्ट्रीयल रिसर्च या संस्थेने २०१०, २०११ आणि २०१२ अशी सलग तीन वर्षे विविध ठिकाणच्या गंगाजलाच्या नमुन्यांवर संशोधन केले आहे.
