नौदलात खलाशांची भरती

भारतीय नौदलामध्ये खलाशांची मोठ्या प्रमाणावर भरती सुरू आहे. लष्करात करिअर करू इच्छिणार्‍या तरुणांनी या संधीचा लाभ घेतला पाहिजे. बारावी उत्तीर्ण असलेल्या आणि १ ऑगस्ट १९९१ ते ३१ जुलै १९९५ या दरम्यान जन्मलेल्या पुरुष उमेदवारांकडून या पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहे. १६ डिसेंबरपर्यंत अर्ज पाठवावे लागतील. उमेदवारांची निवड करण्यासाठी ठरविण्यात आलेला कार्यक्रम इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन अर्जासोबत तपशीलवार समजून घेता येईल. मात्र यासाठीच्या आवश्यक पात्रता समजून घेतल्या पाहिजेत. इच्छुक उमेदवार हा बारावी विज्ञान उत्तीर्ण असला पाहिजे. गणित आणि भौतिक शास्त्र हे विषय त्याने घेतलेले असले पाहिजेत. त्याशिवाय रसायन शास्त्र, जीवशास्त्र आणि संगणक विज्ञान या तीनपैकी एक विषय घेतलेला असला पाहिजे.

उमेदवारांची परीक्षा चार विषयात घेतली जाते. इंग्लिश, शास्त्र, गणित आणि सामान्य ज्ञान असे चार विषय असतात. परीक्षेचा कालावधी एक तास असतो. ती मार्च-एप्रिल २०१२ मध्ये घेतली जाईल आणि २९ जून २०१२ च्या दरम्यान वैद्यकीय तपासणी केली जाईल. उमेदवारांना आधी लेखी परीक्षेत उत्तीर्ण व्हावे लागेल, नंतर वैद्यकीय चाचणीत पात्र ठरल्यावर त्याची ऑगस्ट २०१२ मध्ये सुरू होणार्‍या प्रशिक्षणासाठी निवड केली जाईल. एक वर्षाच्या प्रशिक्षणात तो यशस्वी ठरला तर त्याला खलाशी म्हणून नौदलात भरती केले जाईल. ही सेवा १५ वर्षांची असेल. प्रशिक्षणाच्या काळात दरमहा ५,७०० रुपये विद्यावेतन दिले जाईल आणि प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर त्याची नौदलामध्ये भरती केली जाईल. भरतीनंतर त्याला ५२०० ते २०२०० या वेतनश्रेणी मध्ये वेतन दिले जाईल. या मूळ वेतनाशिवाय महागाई भत्ता, ग्रेड पे, एम.एस.पी. आदी भत्तेही दिले जातील. या उमेदवारांना आपल्या सेवेमध्ये असताना अनेक प्रकारच्या सवलती दिल्या जातील.

नौदलाच्या बोटीवर काम करताना त्यांचा गणवेश, खाणे-पिणे आदी सर्व खर्च नौदलातर्फे केले जातात. त्याशिवाय लष्करातल्या जवानांना दिल्या जाणार्‍या सगळ्या सवलती या खलाशांनाही मिळतात. १५ वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त झाल्यावर निवृत्ती वेतन सुद्धा मिळते. केंद्र सरकारच्या नियमानुसार लागू असलेले रजा आणि सुट्ट्यांचे सर्व नियम याही खलाशांना लागू असतात. इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज डाऊनलोड करण्यासाठी www.nausena-bharti.nic.in ही वेबसाईट ओपन करावी. उमेदवारी अर्ज ऑन लाईन उपलब्ध असला तरी अर्ज पाठवताना मात्र तो साध्या पोस्टाने पाठवावा. स्पीड पोस्ट, कुरिअर किंवा रजिस्टर पोस्टने पाठवलेले अर्ज स्वीकारले जात नाहीत. महाराष्ट्रातील उमेदवारांनी आपले अर्ज खालील पत्त्यावर पाठवावेत.

पोस्ट बॉक्स नं. ७००१, आय.टी.एच.ओ., नवी दिल्ली ११० ००२.  उमेदवारांच्या परीक्षेचे केंद्र आणि ओळखपत्र यांची माहिती योग्य वेळी कळवली जाईल. महाराष्ट्रातल्या तरुणांनी ही एक चांगली संधी साधली पाहिजे. कारण नौदलामध्ये मराठी तरुण फार कमी संख्येने आहेत.

Leave a Comment