सीडॅकने बनविली अंडी अधिक टिकविणारी प्रणाली

पुणे दि.२० – पुण्यातील सीडॅक या संगणक प्रणाली विकसित करणार्‍या संस्थेने योग्य तापमान राखून अंड्यातील हानीकारण जिवाणूंचा प्रादूर्भाव रोखणारी प्रणाली विकसित करण्यात यश मिळविले आहे. यामुळे ग्रामीण भागात शेतकर्‍यांना पूरक जोड उद्योग म्हणून करण्यात येणार्‍या पोल्ट्री व्यवसायास मोठीच मदत मिळणार आहे.

ग्रामीण भागात अनेक शेतकरी तसेच कांही नागरिक जोडव्यवसाय म्हणून पोल्ट्री करतात. अंड्यांना मागणीही प्रचंड आहे. मात्र बरेचवेळा अंडी साठवणुकीची योग्य माहिती नसल्याने अंडी खराब होतात व त्यामुळे शेतकर्‍यांचे नुकसान होते. सीडॅकने विकसित केलेल्या संगणक प्रणाली मुळे या नुकसानीला आळा घालणे शक्य होणार आहे. कॉम्प्युटेशन फ्लुइड डायनॅमिक्स मॉडेल ( सीएमडी) असे या मॉडेलचे नांव असून त्यामुळे अंड्याच्या आतील तापमानाचा अंदाज बाहेरूनच घेता येतो. साठवणूक काळात अंड्याच्या आतील तापमानात बदल झाला तर त्याचा परिणाम अंड्यांत जीवाणूंची वाढ होण्यावर होतो आणि त्यामुळे अंडी खराब होतात असे सीडॅकचे समन्वयक विकास कुमार यांनी सांगितले. या प्रणालीमुळे अंड्यांचे आतील तापमान ७ डिग्रीपर्यंत राखणे शक्य होते व त्यामुळे अंडी खराब होण्यापासून बचाव करण्यात येतो. अंडी टिकविताना हवेचे तापमान, हवेचा वेग विचारात घ्यावा लागतो.

अमेरिकेच्या नेव्रास्का विद्यापीठाशी हे संशोधन संलग्न करण्यात आले आहे. या संशोधनामुळे चांगल्या दर्जाची व सुरक्षित अंडी ग्राहकांना मिळू शकणार आहेत तसेच शेतकर्‍यांचेही नुकसान कमी होणार आहे.

Leave a Comment