विकिलिक्सच्या असांजेने घेतला इक्वेडोर दूतावासात आश्रय

लंडन दि.२०- विकिलिक्सचा संस्थापक आणि लैंगिक गुन्ह्यांप्रकरणी स्वीडनला हवा असलेला ज्युलियन असांजे याने मंगळवारी दुपारी लंडनमधील इक्वेडोरच्या दूतावासात आश्रय घेतला असल्याचे समजते. त्याने आपल्याला आश्रय मिळावा यासाठी केलेला विनंती अर्ज इक्वेडोर सरकारकडे पाठविण्यात आला असून दक्षिण अमेरिकेतील या देशाने यासंबंधात अमेरिका, स्वीडन, यूके या देशांची विचारविनियम करून मगच त्यावर निर्णय घेण्याचे ठरविले आहे. सध्या असंाचे दूतावासात असल्याने त्याला पोलिस पकडू शकत नाहीत असेही सांगण्यात आले आहे.

आपले स्वीडनला हस्तांतरण करू नये अशी याचिका असांजेने युकेच्या सर्वोच्च न्यायालयात केली होती पण ती गेल्याच आठवड्यात फेटाळण्यात आली आहे. स्वीडनला आपले हस्तांतरण करण्यात आले तर आपल्याला अमेरिकेत पाठविले जाईल आणि तेथे आपल्याला मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाईल असे असांजेने या अपिलात नमूद केले होते. असांजेने विकिलिक्सच्या माध्यमातून अमेरिकेसह अनेक देशांच्या राजकीय महत्त्वाच्या केबल्स व संभाषणे जाहीररित्या उघड केली होती व त्यामुळे अनेक देशांची सरकारे तसेच आंतरराष्ट्रीय उद्योगसमूह अडचणीत आले होते. असांजेवर लैंगिक गुन्ह्यांचाही आरोप आहे मात्र असांजे आपण कोणतेही गैरकृत्य केलेले नाही असेच सांगत आहे.

असांजेच्या आश्रय देण्यासंबंधातील अर्जावर जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत असांजे लंडनमधील इक्वेडोरच्यादूतावासातच राहणार असून तेथे त्याला सुरक्षा पुरविण्यात आली आहे. असांजेच्या विनंती अर्जाचा अभ्यास व विश्लेषण करण्यात येत असल्याचेही दूतावासातील अधिकार्‍यांनी सांगितले.

Leave a Comment