पतितपावन गंगा नदी प्रदूषित

डेहराडून, दि. २० – हिंदूधर्मीयांना अत्यंत पवित्र असलेल्या गंगा नदीचे पाणी देवप्रयाग या ठिकाणी आचमन करण्याच्या योग्यतेचे नसल्याचे एका संशोधनाअंती आढळून आले आहे. जलप्रदूषणासंदर्भात संशोधन करणार्‍या श्रीराम इन्स्टिट्यूट फॉर इंडस्ट्रीयल रिसर्च या संस्थेतर्फे गंगोत्री, देव्रपयाग, ऋषिकेश, हरिद्वार, कानपूर, अलाहाबाद, मिर्जापूर, वाराणसी, पाटणा आणि माल्दा अशा दहा ठिकाणच्या गंगाजलावर संशोधन करण्यात आले. त्यावेळी गंगा नदी विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषित असल्याची वस्तुस्थिती पुढे आली आहे. अनेक ठिकाणी गंगेचे पाणी वापरण्यायोग्य नसल्याचे; तसेच हे पाणी शेतीसाठीही उपयुक्त नसल्याचे या संशोधनातून स्पष्ट झाले आहे. श्रीराम इन्स्टिट्यूट फॉर इंडस्ट्रीयल रिसर्च या संस्थेने २०१०, २०११ आणि २०१२ अशी सलग तीन वर्षे विविध ठिकाणच्या गंगाजलाच्या नमुन्यांवर संशोधन केले आहे.

गंगा नदीचे प्रदूषण आणि गंगेवर उभारण्यात येत असलेली धरणे हा विषय सध्या देशभर चर्चिला जात आहे. गंगेच्या पाण्यातील रसायनांचे प्रमाण घटत असल्याचे या संशोधनातून आढळून आले असले तरी गंगेचे पाणी विविध आजारांना निमंत्रण देणारे असल्याचेही लक्षात आले आहे. गंगेच्या पाण्यात विविध ठिकाणी जे सांडपाणी मिसळले जाते, त्यामुळे गंगा मोठ्या प्रमाणात प्रदूषित होत आहे. मात्र अजूनही हे सांडपाणी गंगेच्या प्रवाहात मिसळणार नाही याबाबत ठोस अशी उपाययोजना करण्यात आली नसल्याचेच आढळून आले आहे.

गंगेच्या प्रदूषणामुळे गंगेत आढळणारे डॉल्फिन आणि महाशीरसारख्या माशांचे प्रमाणही कमी होत असल्याचे या संशोधनातून स्पष्ट झाले आहे. गोमुखापासून अवघ्या २० किमी अंतरावरील गंगाजल प्रदूषित असल्याचे संशोधनातून सिद्ध झाले आहे. या वर्षी केलेल्या संशोधनात गंगोत्री येथील गंगाजल पिण्यालायक असल्याचे आढळून आले असले, तरी देवप्रयाग आणि ऋषिकेश येथील गंगाजल पिण्यालायक नसल्याचे सिद्ध झाले आहे. हरिद्वार येथील गंगाजलाची अवस्था तर अत्यंत वाईट आहे. संशोधन अहवालानुसार, हरिद्वार येथील गंगाजल स्नान करण्याच्या योग्यतेचेही नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

Leave a Comment