पुणे, दि. १९ – बेशिस्त वाहनचालक हाच पुण्यातील वाहतूक व्यवस्थेचा मुख्य अडथळा आहे. तसेच बेशिस्तीला काही अंशी प्रशासनच जबाबदार आहे. वाहनचालक परवाना देण्याच्या प्रक्रियेतही बदल करण्याची आवश्यकता असल्याचे मत वाहतूक पोलिस उपायुक्त विश्वास पांढरे यांनी व्यक्त केले.
‘मराठा चेंबर ऑफ कॉमर्स’ची स्वयंसेवी संस्था असलेल्या ‘जनवाणी’ संस्थेतर्फे ‘रस्ता कुणाचा’ या विषयावर चर्चासत्र आयोजित केले होते. या चर्चासत्रात पीएमपीचे चालक, वाहक, रिक्षाचालक, प्रवासी यांनी वाहतुकीतील अडचणी सांगितल्या.
निधी मिळतो म्हणून बीआरटी योजना राबविणार का? असा प्रश्न उपस्थित करत पांढरे यांनी सांगितले की, बीआरटीमधील त्रुटी दूर करून नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करण्याची आवश्यकता आहे. पीएमपी प्रशासनातील सुधारणा आणि वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. गेल्या दोन वर्षांपासून आम्ही ‘ट्राफीकॉप’ योजनेसाठी ४० लाख रूपयांची मागणी करत आहोत. तरीही अजून पैसे मिळत नाहीत. भविष्यातील अडचणी लक्षात घेऊन आताच नियोजन केले पाहिजे. वाहतूक व्यवस्थेतील प्रत्येक घटकाने आपली भूमिका व्यवस्थित पार पाडल्यास वाहतुकीचा प्रश्न सुटण्यास मदत होईल, असेही पांढरे यांनी सांगितले.