नको असलेले एसएमएस ओळखा कलरवरून

मोबाईलवरून एसएमएस पाठविणे किवा एसएमएस स्वीकारणे ही आता नवलाईची बाब राहिलेली नाही. उलट अनेकवेळा नको असलेले हे संदेश म्हणजे मोबाईल धारकाला निष्कारण डोकेदुखीच असते याचाही अनुभव मोबाईल धारक नित्य घेत असतात. मग आता असा संदेश आला तर तो नको असलेला आहे का हवाहवासा वाटणारा आहे हे ओळखायचे कसे ? 

संदेश उघडल्यावर आपण आनंदी होणार आहोत का त्रासणार आहोत हे संदेश वाचण्याअगोदरच कळले तर किती बरे होईल असे तुमच्यासारख्या लाखो मोबाईलधारकांना वाटत असणार. होय ना? मग तुमची ही इच्छा आता लवकरच प्रत्यक्षात उतरण्याची वेळ जवळ आली आहे हे नक्की. ब्रिटनमधील पोर्टस माऊथ विद्यापीठातील स्कूल ऑफ कॉम्प्युटिंग मधील संशोधकांनी त्यासाठी एक प्रणाली विकसित केली आहे. कलर्स कोडींग या तंत्रज्ञानाचा वापर त्यासाठी करण्यात आला आहे.

या तंत्रज्ञानामुळे तुम्हाला आलेला मेसेज हवाहवासा आहे का नकोसा आहे याचा अंदाज मेसेज न उघडतात तुम्हाला करता येणार  आहे कारण तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनचा रंगच तुम्हाला ही बातमी देणार आहे. अँडरोईड ऑपरेटिंग सिस्टीमद्वारे चालणार्‍या मोबाईलवर या नव्या कोडिंग प्रणालीचा वापर करण्यात आला असून सप्टेंबरमध्ये स्पेनमध्ये होणार्‍या आंतरराष्ट्रीय इन्फर्मेशन अँड इंजिनिअरींगवरील १६ व्या आंतरराष्ट्रीय परिषदेत त्याचे निष्कर्ष सादर केले जाणार आहेत.

मोहम्मद गोवर या संशोधकाने त्यासाठी विशेष परिश्रम घेतले असून मोबाईल युजर्सची नको असलेल्या संदेशातून सुटका व्हावी आणि असे नको असलेले संदेश वाचण्याने येणारा मानसिक तणाव कमी व्हावा हाच त्यामागे मुख्य उद्देश असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

Leave a Comment