आमीरखानला संसद स्थायी समितीचे आमंत्रण

नवी दिल्ली दि.१९- वैद्यकीय क्षेत्रातील अनागोंदी आणि गैरव्यवहारांचा आपल्या सत्यमेव जयते कार्यक्रमातून पर्दाफाश करणार्‍या आमीरखानला या प्रश्नावर अधिक चर्चा करण्यासाठी तसेच कार्यक्रमासाठी केलेल्या सर्वेक्षणातून हाती लागलेल्या निष्कर्षांची माहिती घेण्यासाठी गुरूवारी सकाळी संसद समितीने आमंत्रण दिले असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

संसद स्थायी समितीचे नेते भाजपचे शांताकुमार यांनी आमीरला हे आमंत्रण दिले असून तो गुरूवारी सकाळी तेथे उपस्थित होणार आहे असे समजते. आमीरने आपल्या या कार्यक्रमात वैद्यकीय क्षेत्रातील कट प्रॅक्टीस, विनाकारण शस्त्रक्रिया करण्याचे प्रकार, महागडी औषधे देण्याचे प्रकार, रूग्णांची लुबाडणूक करण्याच्या पद्धती यावर जळजळीत प्रकाश टाकला होता. त्याविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशनने आमीरने माफी मागावी अशीही मागणी केली होती. मात्र आमीरने माफी मागायला नकार दिला होता.

आमीरच्या या कार्यक्रमाला जनतेकडून उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे रिपोर्ट सरकारकडे आहेत. त्यामुळेच वैद्यकीय क्षेत्रातील गैरव्यवहार खरेच कसे चालतात हे जाणून घेण्याची उत्सुकता संसद स्थायी समितीने दाखविली असून त्यासाठीच आमीरला माहिती देवाणघेवाण आणि चर्चेसाठी आमंत्रित करण्यात आले आहे.

Leave a Comment