प्रणवदांचे ‘पारडे’ अधिक जड

नवी दिल्ली दि.१९- राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या(रालोआ) बैठकीत लोकसभेचे माजी सभापती पी. ए. संगमा यांना उमेदवारी देण्याबाबत मतैक्य होण्याची शक्यता मावळल्याने राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत ‘यूपीए’चे उमेदवार व केन्द्रीय मंत्री प्रणव मुखर्जी यांचे पारडे अधिक जड झाले असल्याचे चित्र मंगळवारी पाहावयास मिळाले.

रविवारी रालोआच्या बैठकीवर शिवसेनेने टाकलेला बहिष्कार आणि प्रणव मुखर्जी यांनी सोमवारी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दूरध्वनी करून पाठिंबा देण्याची विनंती केली तेव्हाच शिवसेना मुखर्जींना पाठिंबा देणार असे स्पष्ट संकेत मिळत होते. मागील राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीतही शिवसेनेने ‘यूपीए’च्या उमेदवार प्रतिभा पाटील यांना पाठिंबा देऊन ‘रालोआ’त फूट पाडली होती. या वेळीही पाच वर्षांनी इतिहासाची पुनरावृत्ती झाली आहे.

मुखर्जींना पाठिंबा देताना देशहितासाठी हम सब एक है, असे शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’मध्ये म्हटले आहे. मुखर्जींना पाठिबा देण्यात देशहित असेलही पण, संगमा किंवा कलाम यांच्या नावाला पाठिंबा देण्यात देशहित नव्हते का, याचे स्पष्टीकरण मात्र मुखपत्रात देण्यात आले नाही.
 
डॉ. कलाम यांनी निवडणूक लढविण्यास उशीरा नकार दिल्याने ममता बॅनर्जी, अडवाणी आदिची खूपच पंचाईत झाली. त्यांचे नाव जाहीर करण्यापूर्वी ममता किवा अडवाणी हे कलाम यांची संमत्ती घेण्यास कसे विसरले याचेच राजकीय निरीक्षकांना आश्चर्य वाटत आहे.स्पर्धेतून कलाम बाहेर पडल्याने संगमा यांनी सुटकेचा निश्वास टाकला असून आता ते पाठिंब्यासाठी ममता व अडवाणी यांना साकडे घालत आहेत. रालोआमध्ये संगमा यांना पाठिंबा देण्यावरूनही मतभेद आहेत. संयुक्त जनता दल, अकाली दल हे मुखर्जींना अनुकूल आहेत. तर, मुखर्जींना बिनविरोध निवडून जाऊ द्यायचे नाही, असा चंग भाजपमधील एका गटाने बांधला आहे.

राजकीय आघाडीत जशी फूट पडली तशी ‘टीम अण्णा’ मध्येही पडली आहे. केजरीवाल यांनी प्रणव मुखर्जींवरील आरोपांची प्रथम तटस्थपणे चौकशी करावी अशी मागणी केली तर, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मते, मुखर्जी हे अन्य केंद्रीय मंत्र्यांपेक्षा खूप बरे आहेत.
 
या सर्व राजकीय गोंधळामुळे म्हणा किवा संभ्रवावस्थेमुळे प्रणव मुखर्जींचे पारडे अधिक जड झाले असून रालोआने पाठिंबा न दिल्यास संगमा माघार घेण्याची शक्यता लक्षात घेता मुखर्जी हे बिनविरोध निवडून आल्यास राजकीय निरीक्षकांना आश्चर्य वाटणार नाही.