जागतिक मंदीतून बाहेर येण्यासाठी ठाम भूमिकेची आवश्यकता – पंतप्रधान

मेक्सिको सिटी, दि. १९ जून – दिवसेंदिवस गंभीर होत जाणारी जागतिक अर्थव्यवस्था कोसळण्यापासून वाचविण्याच्या दृष्टीने जी-२० गटाच्या मेक्सिको बैठकीत विचारविनिमय होईल आणि या संकटातून बाहेर येण्याचा मार्गही निघेल, अशी आशा पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी व्यक्त केली आहे. जी-२० गटाच्या बैठकीला उपस्थित राहण्याची पंतप्रधानांची ही सलग सहावी वेळ आहे.

जी-२० गटाच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान सोमवारी येथे डेरेदाखल झाले. विद्यमान परिस्थितीबाबत चिंता व्यक्त करतानाच याचा मुकाबला कऱण्यासाठी तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे, असा इशाराही मनमोहन सिंह यांनी दिला. दोन दिवस चालणार्‍या या बैठकीवर युरोझोनच्या संकटाचे सावट असेल. वस्तुतः यंदा भारताच्या विकासाची गती गेल्या दशकभरातील निचांकी आहे. या मंदावलेल्या आर्थिक विकासाच्या गतीशी झुंजण्यातच राष्ट्रीय प्रशासनाची शक्ती खर्च होत आहे.

जागतिक आर्थिक परिस्थितीचा आढावा घेतला तर पुन्हा एकदा २००८ सालातील महामंदीची स्थिती निर्माण होत असल्याचे दिसते. जगभरातील सर्व राष्ट्रांनी परस्पर सहकार्याची आणि एकजुटीची भूमिका घेतली तर यातूनही बाहेर पडणे अवघड नाही, असे पंतप्रधान म्हणाले. विकसित राष्ट्रांनी आता केवळ चर्चा करून भागणार नाही, तर त्यांनी कृती करणे आवश्यक आहे, असे आवाहनही त्यांनी केले.

भारताची परिस्थिती जागतिक परिस्थितीपेक्षा वेगळी नाही. गतवर्षी मार्चअखेर भारताच्या विकासाची गती ९.२ टक्के होती. पण यंदा याच काळात म्हणजे वर्षाच्या पहिल्या तिमाहीअखेर ती घसरून केवळ ५.३ टक्क्यांवर आली आहे. याचा कृषी आणि संलग्न व्यवसाय तसेच बांधकाम व्यवसायावरही गंभीर परिणाम झाला आहे.

स्वतः काही उपाययोजना सुचविण्याऐवजी युरोपिय समुदायानेच यातून मार्ग काढावा, असे आवाहन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा करण्याची शक्यता अधिक आहे. त्यांनी गुरूवारी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्याशी यावर चर्चा केली. युरोपमधील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या जर्मनीच्या अध्यक्ष (चॅन्सलर) ऍन्जेला मार्केल यांना देखील युरोझोन स्वतःच्या ताकदीवर या आर्थिक संकटावर मात करील, असा विश्‍वास वाटतो.

 

Leave a Comment