स्वीडनला ३-२ ने नमवून इंग्लंड उपांत्यपूर्व फेरीत

कीव्ह, दि. १६ – युरो करंडक २०१२ फुटबॉल स्पर्धेत ‘ड‘ गटाच्या सामन्यात इंग्लंडने स्वीडनचा ३-२ गुणसंख्येने पराभव करीत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला. या रोमांचक लढतीतील पहिल्या सत्रात इंग्लंडने स्वीडनवर १-० आघाडी घेतली तर दुसर्‍या सत्रात स्वीडनने २-१ अशी आघाडी घेतली. मात्र निर्णायक क्षणी इंग्लंडच्या खेळाडूंनी दोन गोल करुन सामना आपल्या नावावर केला. इंग्लंडच्या डनी वेलबेक याने विजयी गोल केला.

या विजयाने इंग्लंड ४ गुणांसह गुणतालिकेत दुसर्‍या स्थानावर पोहचला आहे. अॅण्डी कॅरोलने इंग्लंडतर्फे सामन्याच्या २३ व्या मिनिटाला पहिला गोल केला. स्वीडनचे खाते सामन्याच्या दुसर्‍या सत्रात म्हणजेच ४९ मिनिटाला उघडले. ५९ व्या मिनिटाला स्वीडनने सामन्यात ओलोफ मेलबर्गकरवी आघाडी घेतली. पण ही आघाडी त्यांना जास्त वेळ टिकवता आली नाही. सामन्याच्या ६४ व्या मिनीटाला थिया वॉलकॉटने इंग्लंडला स्वीडनशी बरोबरी साधून दिली. डॅनी वेलबेक ने ७८ व्या मिनिटाला सामन्याचा निर्णायक गोल करीत इंग्लंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

या पराभवाने स्वीडनचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. या स्पर्धेतून आत्तापर्यंत बाहेर पडावे लागलेला हा दुसरा देश आहे. इंग्लंडचा शेवटचा सामना करंडकाचे सहआयोजक युक्रेनशी मंगळवारी होणार आहे. 

Leave a Comment