सुनील तटकरे यांनी २५ हजार कोटी रूपयांचा घोटाळा केल्याचा आरोप

मुंबई, दि. १८ –  राज्याचे जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांच्यावर २५ हजार कोटी रूपयांच्या घोटाळ्याचा गंभीर आरोप भाजपाचे राष्ट्रीय सचिव किरीट सोमय्या यांनी केला आहे. या घोटाळ्यात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बडे नेते गुंतले असून, आपण लवकरच या नेत्यांची नावे जाहीर करू, असेही त्यांनी सांगितले. राज्यातला आतापर्यंतचा हा सर्वात मोठा घोटाळा असल्याचे सोमय्या यांनी सागितले.

हा घोटाळ केवळ तटकरे यांच्यापुरताच मर्यादित नाही, तर यात मुंबई आणि दिल्लीतले कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे बडे नेते सामील आहेत तर १००० कंपन्या या घोटाळ्यांसाठी बनवण्यात आल्याचे सोमय्या यांनी नमूद केले. या घोटाळ्यांची संपूर्ण माहिती घेण्यासाठी आपण ३ चार्टर्ड अकांउंटट्स आणि दोन कंपनी सेक्रेटरींची मदत घेत असून आतापर्यंत ५०० कंपन्यांच्या हिशोबातील १०,२३० कोटी रूपयांच्या अवैध आर्थिक व्यवहाराची माहिती आपल्याला मिळाली असल्याचे सोमय्या यांनी सांगितले.

प्रफुल्ल पटेल हे तटकरे यांची साथीदार
तटकरे यांच्या कंपन्यात राष्ट्रकुल घोटाळा, विमान खरेदी घोटाळा आणि २ जी स्पेक्ट्रम घोटाळयांमधील पैसे गुंतलेले आहेत, असा आरोप करीत, केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांचा पैसा यात गुंतलेला असल्याची शंका सोमय्या यांनी व्यक्त केली.

विनम्र युनीवर्सल ट्रेडर्स प्रा. लि. या कंपनीची शेअर व्हॅल्यू केवळ एक लाख रूपये आहे. मात्र या कंपनीला ३ हजार ५९२ कोटींचे कर्ज मिळाले आहे असे सांगत सोमय्या यांनी ज्या कंपनीची शेअर व्हॅल्यू केवळ १ लाख असेल तर इतकी मोठी रक्कम कर्जाऊ कशी मिळू शकते असा सवाल केला. निवृत्त न्यायाधीशांद्वारे या पूर्ण घोटाळ्याची चौकशी व्हावी अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली. त्याचबरोबर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सिंचन विभागावर श्‍वेतपत्रिका का काढत नाहीत, असा प्रश्‍नही त्यांनी विचारला.