वैद्यकीय संशोधन

समाजामध्ये डॉक्टर आणि इंजिनिअर होण्याकडे सर्वांचाच ओढा आहे. त्यातल्या त्यात डॉक्टरपेक्षा इंजिनिअरकडे सध्या जास्त कल आहे आणि वैद्यकीय क्षेत्रात सुद्धा स्वत:ची प्रॅक्टिस सुरू करणे हे बर्‍याच जणांचे लक्ष्य असते. त्याआधी कोठे तरी नोकरी करून अनुभव घेतला जातो आणि लवकरात लवकर म्हटले तरी स्वत:चा दवाखाना उभा करेपर्यंत डॉक्टरने वयाची पस्तीशी ओलांडलेली असते. म्हणजे वैद्यकीय व्यवसायामध्ये स्थिर व्हायला निम्मे आयुष्य ओलांडावे लागते. या सगळ्या धावपळीत वैद्यकीय संशोधनाकडे लक्ष द्यायला कोणालाच वेळ नसतो.

एखाद्या वैद्यकीय विद्यार्थ्याच्या मनामध्ये संशोधन करावे अशी इच्छा असू शकते, परंतु स्वत:च्या पायावर उभे राहण्यातच बराच वेळ जात असल्यामुळे संशोधनाकडे वळायला उसंतच मिळत नाही. त्यामुळे वैद्यकीय संशोधनाचे क्षेत्र बरेच ओस पडलेले आहे आणि गरज मात्र खूप आहे. कारण माणसाचे शरीर हे एक अद्भूत यंत्र आहे. त्याच्यावर करेल तेवढे संशोधन कमीच आहे. जितके खोलात शिरून संशोधन कराल तितके त्या शरीरात नवे काही तरी सापडत जाते आणि डॉक्टर मंडळी जेवढे जास्त संशोधन करतील तेवढी औषध निर्मितीला गती मिळते. वैद्यकीय क्षेत्रात संशोधन करणे हे एक मानवतेचे कार्य आहे. म्हणून वैद्यकीय पदव्युत्तर पदवी घेतल्यानंतर डॉक्टरांनी संशोधनाकडे वळले पाहिजे आणि याही क्षेत्रातील डॉक्टरेट मिळवली पाहिजे. मात्र डॉक्टरेट मिळवून नावाच्या मागे डॉ. हे अभिधान लागण्यापेक्षा एम.बी.बी.एस. करून हे अभिधान लावण्यास समाधान मानले जाते. मुळात विद्यार्थ्यांचा ओढा नसल्यामुळे विद्यापीठे सुद्धा वैद्यकीय संशोधनाला महत्व देत नाहीत.

बंगलूर येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ ऍन्ड न्यूरो सायन्सेस ही संस्था मात्र वैद्यकीय संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी उभी करण्यात आली आहे. वैद्यकीय पदवी परीक्षा किमान ५५ टक्के गुण घेऊन उत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थ्यांना या संस्थेत संशोधनासाठी प्रवेश दिला जातो. या संस्थेत विशेष करून मानसिक विकारांवर आणि मेंदूच्या विकारांवर संशोधन करण्यावर भर दिला जातो. न्यूरोसायन्स, न्यूरोमायक्रोबायालॉजी, न्यूरोफिजिआलॉजी, न्यूरोव्हायरालॉजी आणि सायकियाट्री या विषयावर जादा तर संशोधन केले जाते. या संस्थेत संशोधनासाठी दाखल होऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्याला संस्थेत एक वर्षाची इंटर्नशीप करावी लागते किंवा कर्नाटकाच्या स्टेट मेडिकल कौन्सिलमध्ये आपल्या नावाची नोंदणी करावी लागते. तिथे त्यांना संशोधनासाठी आवश्यक असलेले मार्गदर्शन मिळते आणि साधनेही उपलब्ध करून दिली जातात.

सध्या आपल्या देशामध्ये वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांची फार चणचण भासत आहे. त्यामुळे प्राध्यापक हा डॉक्टरेट पूर्ण केलेला असलाच पाहिजे असा आग्रह आता तरी धरता येत नाही. परंतु पुढे प्राध्यापक उपलब्ध होतील तेव्हा डॉक्टरेट ही प्राध्यापकीसाठी आवश्यक पात्रता ठरणार आहे. प्राध्यापकीत करिअर करू इच्छिणार्‍या लोकांना ही डॉक्टरेट उपयुक्त ठरणार आहे. या संस्थेचा पत्ता- होसूर रोड, बंगलूर पिन कोड ५६००२९ असा आहे. ईमेल .nimhans.kar.nic.in असा आहे.

Leave a Comment