स्वीस बँकेतील पैसा : भारतीयांचा क्रमांक ५५वा

नवी दिल्ली,  दि. १८ – देशातील अनेकांनी आपल्याकडील काळा पैसा स्वीस बँकेत ठेवल्याचा आरोप केला जात असताना स्वीस बँकेतील एकूण ठेवींपैकी केवळ ०.१४ टक्के रक्कम भारतीयांची असल्याची माहिती स्वित्झर्लंडमधील केंद्रीय बँक असलेल्या स्वीस नॅशनल बॅकेने दिली आहे. परदेशातून स्वीस बँकेत ठेवल्या जाणार्‍या देशांच्या यादीमध्ये भारताचा क्रमांक ५५ असल्याचे एसएनबीने म्हटले आहे.

स्वीस बँकेतील काळ्या पैशाच्या संदर्भात भारतात विविध अंदाज व्यक्त केले जात असतात. इतकेच नव्हे तर स्वीस बँकेत सर्वाधिक पैसा भारतीयांचाच असेल असाही दावा करण्यात येतो. मात्र प्रत्यक्षात परदेशातून स्वीस बँकेत ठेवण्यात आलेल्यापैकी केवळ ०.१४ टक्के रक्कम भारतीयांची आहे.

स्वीस बँकेत २०११ अखेर एकूण ९० लाख कोटी रुपये ठेवण्यात आल्याचे एसएनबीने म्हटले आहे. स्वीस बँकेत ठेवण्यात आलेल्या परदेशी ठेवींपैकी सर्वाधिक वाटा इंग्लंडचा असल्याचे या अहवालात म्हटले आहे. स्वीस बँकेतेतील एकूण ठेवीच्या २० टक्के रक्कम इंग्लंडमधील आहे. तर त्या पाठोपाठ १८ टक्क्यांसह अमेरिकेचा क्रमांक लागतो.

या यादीतील अव्वल देशांमध्ये वेस्ट इंडिज, जर्मनी, फ्रान्स, पनामा, जपान, सिंगापूर, ऑस्टेलिया इटली, नेदरलँड, रशिया, सौदी अरब, संयुक्त अरब अमिरात आदी देशांचा समावेश आहे.

स्वीस बँकेत २०११ या वर्षात सुमारे १२ हजार ७४० कोटी रुपये ठेवण्यात आल्याचे एसएनबीने १४ जून रोजी प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले होते.

Leave a Comment