वरूण गांधी पुन्हा सक्रीय

नवी दिल्ली दि.१८- गेले वर्षभर उत्तर प्रदेशातील विधानसभा आणि लोकसभेच्या पोटनिवडणुकीत प्रचार आणि सभांपासून दूर राहिलेले भाजपचे सर्वात तरूण खासदार वरूण गांधी उत्तरप्रदेशातील महापालिका निवडणुकांत पुन्हा सक्रीय झाले आहेत.मेरठ मधील महापौर व  नगरसेवक प्रचारासाठी ते सोमवारी सभा घेत असून अशाच सभा ते मुरादाबाद आणि आग्रा येथेही घेणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

लखनौ येथे भाजपच्या २०११ सालच्या पक्ष बैठकीत वरूण उपस्थित होते मात्र त्यानंतरच्या एकाही बैठकीला त्यांनी उपस्थिती लावली नव्हती. इतकेच नव्हे तर उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत भाजप वरीष्ठ नेत्यांनी स्टार प्रचारक म्हणून वरूण यांना प्रचारात उतरविण्याचा निर्णय घेऊनही वरूण पिलभीत या आपल्या मतदारसंघाबाहेर पडले नाहीत. या मतदारसंघातील पाच उमेदवार वरूण यांच्या पसंतीचेच देण्यात आले होते. मात्र वरूण यांना उत्तरप्रदेशात आता कांही स्वारस्य उरलेले नाही असे त्यांचे निकटवर्तीय सांगत असून वरूण राष्ट्रीय राजकारणावरच अधिक लक्ष केंद्रीत करणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. लोकसभेच्या निवडणुकांपूर्वी वरूण यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी भाजप सोपवेल असे संकेतही देण्यात आले आहेत.

Leave a Comment