हैदराबाद दि.१७- जी. जनार्दन रेड्डी जामिनासाठी पैसे घेतल्याच्या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने निवृत्त न्यायमूर्ती टीव्ही चलपती राव आणि सीबीआय न्यायालयाचे निलंबित न्यायमूर्ती टी. पट्टाभिरामा राव यांचे पुत्र टी. रवी चंद्रा यांना अटक केली.
निवृत्त न्यायमूर्ती व निलंबित न्यायमूर्तीच्या मुलास अटक
तत्पूर्वी सकाळी भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने पट्टाभिरामा राव आणि चलपती राव यांच्या हैदराबाद येथील निवासस्थानी छापे घातले. तसेच, चलपती राव यांचे नातेवाईक पी. श्रीनिवास राव यांच्या चिकलुरीपेट(जि. गुंटूर) आणि वकील इ. उमा माहेश्वर राव यांच्याही निवासस्थानी छापे घातले. चलपती राव व रवी चंद्रा यांना अटक करण्यापूर्वी भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागातील अधिकार्यांनी काही प्रश्न विचारले.
सीबीआयने ८ जून रोजी भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाकडे केलेल्या तक्रारीत म्हटले होते की, अवैध खाणप्रकरणी जी. जनार्दन रेड्डी यांना जामीन मिळावा म्हणून माजी प्रथम अतिरिक्त विशेष न्यायमूर्ती टी. पट्टाभिरामा राव व अन्य सात जणांनी कट कारस्थान रचले आहे.
सीबीआयने केलेल्या तक्रारीत म्हटले की, रवी चंद्रा यांच्या ताब्यात असलेली किल्ली मिळाल्यावर शहरातील पाच बँक लॉकरमधून १ कोटी ६२ लाख रुपये जप्त करण्यात आले.