
नवी दिल्ली, दि.१५ -संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात युपीएने केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांना शुक्रवारी राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी जाहीर केली. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मुखर्जी यांच्या नावाची घोषणा केली. मुखर्जी यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर समाजवादी पक्षानेही मुखर्जी यांच्या नावाला पाठिंबा दिला असल्याचे जाहीर केले. दरम्यान, एपीजे अब्दुल कलाम हेच आपले राष्ट्रपतीपदासाठीचे उमेदवार असतील अशी ताठर भूमिका तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जाहीर केली. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय लोकशाही आघाडीने आपली भूमिका अद्याप गुलदस्त्यातच ठेवली आहे. राष्ट्रपतीपदासाठी आता प्रणव मुखर्जी आणि एपीजे अब्दुल कलाम यांच्यात लढत होण्याची शक्यता तूर्तास तरी दिसत आहे.
