इस्लामाबाद दि. १५- पाकिस्तानातील विद्यमान प्रशासनाने भारताशी होणारा व्यापार अधिक सुकर करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वीचे सरकार या महत्त्वाच्या बाबीवर निर्णय घेण्यास इच्छुक नव्हते. उभय देशांमधील संबंधांमध्ये गुणात्मक सुधारणा घडवून आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे, असे पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांनी येथे सांगितले.
यापूर्वीच्या एकाही सरकारने या प्रकरणात लक्ष घालण्याची तसदी घेतली नव्हती. परंतु, आमच्या सरकारने राष्ट्रीय आणि प्रादेशिक दृष्टीकोनातून हा विषय तडीस नेण्याचे ठरविले आहे, असेही ते म्हणाले.
इस्लामाबादमधील राष्ट्रीय संरक्षण विद्यापीठातील पदवीदान समारंभात भारत आणि पाकिस्तानमधील संबंधाचे विवेचन करताना गिलानी म्हणाले, की या दोन्ही देशांमधील संबंध स्थिर आणि सौहार्दपूर्ण आहेत. हे संबंध अधिक दृढ करण्यासाठी पारंपरिक पद्धतीला छेद देऊन, सरकारने सकारात्मक धोरण स्वीकारले आहे.
दोन्ही देशांतील संबंध सुरळीत करण्यासाठी पाकिस्तानने सियाचीनसह, सर खाडी, दहशतवाद प्रतिबंधक उपाययोजना, पाणीप्रश्न आणि सर्वांत महत्त्वाचा जम्मू-काश्मीर प्रश्नावर सर्वंकष चर्चा सुरू केली आहे. दोन्ही देश अण्वस्त्रधारक असल्यामुळे आण्विक धोरण आणि संघर्ष ठरावावरही चर्चा चालू आहे.
दोन वर्षांच्या खंडानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये चर्चेच्या फेर्या पुन्हा सुरू झाल्या आहेत. यापूर्वी २००८ मधील मुंबईतील दहशतवादी हल्ल्यानंतर ही चर्चा थांबविण्यात आली होती. पाकिस्तानातील लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेचा या हल्ल्यामागे हात असल्याचा भारताने आरोप केला आहे.