नाकाच्या किरकोळ विकारांवरील उपचार


आपल्या पाच ज्ञानेंद्रियांपैकी चार महत्त्वाची ज्ञानेंद्रिये ही आपल्या चेहर्‍यावरच आहेत. पाचवे ज्ञानेंद्रिय म्हणजे त्वचा. ते संपूर्ण शरीरच व्यापून असते. ज्ञानेंद्रिये स्वस्थ असतील तर बरेच विकार आपोआपच दूर राहतात. आजकाल हवेतील प्रदूषणामुळे नाकांच्या विकारात खूपच वाढ झालेली दिसून येते. नाकावाटे आपण श्वसन करतो आणि त्यातूनच आपल्या शरीराचे कार्य सुरळीत ठेवण्यासाठी लागणारा प्राणवायू आपण शरीरात घेतो आणि शरीरात तयार होणारा कार्बन डाय ऑक्साईड वायू बाहेर टाकत असतो. त्यामुळे नाक किवा घाणेंद्रियाची काळजी घेणे अत्यंत आवश्यक असते. या नाकाच्या विकारांवर कांही गुणकारी उपचार घरच्या घरीच करता येतात ते असे.

१)नाक चोंदणे- कानात कापसाचे बोळे घालावेत. गरम पाण्याच्या पिशवीने कपाळ शेकावे. साजूक तुपाचे थेंब नाकात घातल्यानेही नाक मोकळे होते.

२)सर्दी- तीव्रता अधिक असल्यास रुमालावर निलगिरी तेलाचे थेंब टाकून हुंगणे. ओवा तव्यात भाजून त्याची धुरी घेणे अथवा नुसते गरम पाण्याच्या पिशवीने डोके कपाळ शेकल्यास सर्दी कमी होते.

३)नाकात माळीण होणे- साजूक तूप नाकात सोडावे. माळीण म्हणजे नाकपुडीच्या आत होणारे फोड. यामुळे वेदना होतात तसेच श्वसनालाही त्रास होतो. प्रामुख्याने हा उष्णतेचा विकार आहे. सुगंधी फुलाचा वास घेणे असाही उपचार यावर सांगितला जातो.

४)गुळणा फुटणे- गुळणा फुटणे म्हणजे नाकातून अचानक रक्त येणे. हा ही उन्हामुळेच होणारा विकार आहे. त्यावर मान खाली करून मस्तकावर आणि कपाळावर गार पाणी मारल्यास हे रक्त वाहणे थांबते. गादीवर डोके थोडे वरच्या बाजूला कलते करून दोन तीन मिनिटे झोपल्यासही रक्त वाहणे थांबते.

५) नाकात काही गेल्यास – तपकीर अथवा मिरी पावडर हुंगायला देउन शिंका काढण्याने नाकात गेलेली वस्तू बाहेर येते. अन्यथा आपोआप घशात उतरते. लहान मुले बरेचवेळा नाकात शेंगदाणे, पेन्सिली अशा वस्तू घालतात, त्यावेळी मात्र तज्ञ डॉक्टरकडे नेऊनच त्या काढाव्यात.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment